corona possitive

पैठणमध्ये सहाजण कोरोना पॉझिटीव्ह

न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा

औरंगाबादचे लोण पैठणकडे सरकू लागले

पैठण : पैठण शहरातील एक ज्येष्ठ महिला कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर तिच्या संपर्कात असलेल्या परिवारातील इतर नातेवाईकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. 12 नमुन्यांपैकी 6 नमुने तपासणीत पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. ही माहिती पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिली.

पैठण शहरातील राहणारे आणि त्या ज्येष्ठ महिलेच्या संपर्कात असलेल्या इतर नातेवाईक व्यक्तींची माहिती आरोग्य विभागांने घेऊन त्यांची तपासणी केली होती. सध्या या महिलेवर औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सहा जणांचे चे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यामुळे त्यांना पैठण येथील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार सुरू करण्यात येत आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ विजय वाघ यांनी दिली. खबरदारीचा उपाय म्हणून नगरपरिषदेच्या वतीने या परिसरात निर्जंतुकीकरण करणारे पथक कार्यरत करण्यात आल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी दिले आहे. दरम्यान औरंगाबादमधील कोरोनाचा आकडा आता दिवसागणिक 100 ने वाढत आहे. बुधवारी सकाळी आलेल्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या रिपोर्टमध्ये 125 जण पॉझिटीव्ह आढळून आले. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्याची एकूण संख्या 3961 झाली आहे. त्यातील 2336 रुग्ण बरे झाले असून 206 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1619 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान औरंगाबादमध्ये पसरलेलं कोरोनाचं लोण आता ग्रामीण भागाकडे सरकू लागल्याने नागरिक धास्तावलेले आहेत.

Tagged