common

कापूस विक्रीसाठी शेतकर्‍यांच्या आडून व्यापार्‍यांच्या नोंदी?

बीड

माजलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत कापुस विक्रीसाठी 4196 शेतकर्‍यांनी नोंदी केल्या होत्या. त्यापैकी 2903 शेतकर्‍यांच्या कापसाची खरेदी करण्यात आली असून 1293 शेतकरी वंचित आहेत, तर अचानक दि.1 जुन ते 3 जुन अशा तीन दिवसाच्या दरम्याण 905 शेतकर्‍यांनी नोंदी केल्याचे समोर आले आहे. यावरून ह्या नोंदी शेतकर्‍यांच्या की? शेतकर्‍यांच्या आडून व्यापार्‍यांचे गौडबंगाल काय? असा सुर सामान्यातून उमटत आहे. त्यावर सावध पवित्रा घेत बाजार समितीच्या वतीने नोंद केलेल्या शेतकर्‍यांच्या घरोघरी जावून पंचनामे करणार असल्याचे सभापती अशोक डक यांनी सांगितले.

     तालुक्यात नगदी पिक म्हणून कापुस या पिकांकडे पाहिले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तालुक्यात कापुस उत्पादन होते. माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आली. त्याकामी शेतकर्‍यांच्या दि. 27 फेब्रुवारी 2020 ते 13 मार्च 2020 दरम्याण 4196 नोंदी झाल्या होत्या. त्यापैकी 2903 शेतकर्‍यांच्या कापसाची शासकीय खरेदी झाली असून 1293 शेतकरी अद्याप खरेदीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यापैकी 130 नोंदी ह्या परजिल्ह्यातील असल्याने त्यांची खरेदी तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान कापूस खरेदी बाबत शासन दरबारी मागणी होत असल्याने दि.30 मे 2020 रोजी जिल्हा उपनिबंधक यानी 1 जुन ते 3 जुन 2020 दरम्याण नोंदी पासून वंचित शेतकर्‍यांच्या नोंदी घेण्याचे आदेश दिले. त्यावर बाजार समितीत तीन दिवसातच 905 शेतकर्‍यांच्या नोंदी झाल्या आहेत. परंतू ह्या नोंदी शेतकर्‍यांच्या का? शेतकर्‍यांच्या आडून व्यापार्‍यांच्या हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असून तीन दिवसातील सर्वाधिक नोंदीचे नेमके गौडबंगाल काय? असा सूर निघत आहे. ह्या गौडबंगालाबाबतची चर्चा सभापती अशोक डक यांच्या कान्ही गेल्याने, त्यांनी सावध पवित्रा घेत. कापुस विक्रीसाठी नोंद केलेल्या शेतकर्‍यांच्या घरोघरी जावून पंचनामे करण्यासाठी 6 पथके नेमली असून त्यात दोन कर्मचारी असा समावेश आहे. ही पथके तालुक्यातील सहा मंडळात तीन दिवसात कापुस नोंद असलेल्या शेतकर्‍यांचाच आहे का? याबाबत पडताळणी करणार आहे.

शेतकर्‍यांचे कापसाचे बोंड शिल्लक ठेवणार नाही : अशोक डक
माजलगाव तालुक्यात एकूण आठ शासकीय कापूस खरेदी केंद्र आहेत. ही कापूस केंद्रे सुरळीत चालू होती, परंतु पावसामुळे कापूस घेण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतकर्‍यांनी काळजी करू नये, आपण एकही बोंड शिल्लक ठेवणार नाही सर्व शेतकर्‍यांचा कापूस खरेदी केला जाईल व तसेच नोंद केलेल्या शेतकर्‍यांच्या कापसाचा गावात जाऊन पंचनामा केला जाईल असे बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी सांगीतले.

व्यापार्‍यांची धाबे दणाणले
तीन दिवसात सर्वाधिक 905 नोंदी बाजार समितीकडे झाल्या. यात शेतकरी किती अन् शेतकर्‍यांआड व्यापारी किती याचे दुध का दुध, पाणी का पाणी? होणार असल्याने आत्ता व्यापार्‍यांचे धाबे चांगलेच दणाणले असून पळापळ होत असतांना दिसून येत आहे.