common

धक्कादायक! बियाणे उगवलेच नाही; परळी पाठोपाठ केजमध्येही तक्रारी

केज न्यूज ऑफ द डे बीड शेती

केज : सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी परळी पाठोपाठ आता केज तालुक्यातीलही शेतकऱ्यांनी केल्या आहेत. प्रशासनाने बोगस बियाणे पुरवठा करणाऱ्या कंपनीविरोधात फौजदारी कारवाई करावी. तसेच, तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी विडा गणाचे पंचायत समिती सदस्य पिंटू उर्फ दत्तात्रय ठोंबरे यांनी केज तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्याकडे शनिवारी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात पुढे म्हटले की, केज तालुक्यात यावर्षी वेळेवर खरीपाच्या पेरणी होत आहेत. अशावेळी बोगस बियाणे व खते विक्री पुरवठा आणि विक्री करणाऱ्यांचा मात्र सुळसुळाट झाला आहे. विडा गटातील जोला, दहिफळ वडमाऊली, सासुरा, देवगाव परिसरातील गावात बहुतांशी शेतकऱ्यांनी सोयाबीनचे महा गुजरात 335, 228 जातीचे बियाणे पेरले होते. या बियाणे खरेदीच्या पावत्या आहेत. पेरणी झाल्यानंतर अपवाद वगळता पेरण्यात आलेल्या 85 टक्के शेतकऱ्यांचे बियाणे उगवलेच नाही. याबाबत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून प्रशासनाने तातडीने पेरणी केलेल्या क्षेत्राचा पंचनामा करावा. दोषी कंपनीवर फौजदारी कारवाई करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अन्यथा शेतकऱ्यांच्यावतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा पंचायत समिती सदस्य पिंटू उर्फ दत्तात्रय ठोंबरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Tagged