धक्कादायक… नगरमध्ये महिलेचा बेकायदेशीर गर्भपात, डॉक्टरला अटक

क्राईम महाराष्ट्र

नगर: एका महिलेचा बेकायदेशीर गर्भपात केल्याची धक्कादायक घटना नगर तालुक्यातील जखणगाव येथे घडली आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. शंकरप्रसाद दिगंबर गंधे (वय 50) याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल रात्री उशिरा ही कारवाई केली.

जखणगाव येथील गंधे हॉस्पिटलमध्ये काल रात्री उशिरा एका महिलेचा बेकायदेशीररित्या गर्भपात केला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एक महिला त्या ठिकाणी आढळून आली. चौकशी केली असता त्या महिलेचा गर्भपात केला असल्याचा संशय आला.

पोलिसांनी तातडीने या घटनेबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांना माहिती दिली. डॉ. मुरंबीकर यांनी पथकासह हॉस्पिटलमध्ये येऊन पाहणी केली. त्यावेळी डॉ. गंधे याने महिलेचा बेकायदा गर्भपात केला असल्याचे उघड झाले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व नगर तालुका पोलिसांनी डॉक्टर गंधे याला अटक केली. गंधे याच्याविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Tagged