crime

तरुणाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने केली आत्महत्या

न्यूज ऑफ द डे परळी

परळी : नर्सिंगचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना (दि. 12) परळीत घडली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन शहरातील एका तरुणावर अ‍ॅट्रॉसिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

निकिता सखाराम जगतकर (वय 24, रा. जगतकर गल्ली, भीमनगर, परळी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. सखाराम जगताप यांनी फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, निकिता सध्या नर्सिंगचे शिक्षण घेत होती. निकिताचा कोणासोबही वाद नव्हता. मात्र, काही काळापासून तिला उस्मान लतीफ शेख (रा. मुल्ला गल्ली, ईस्लामपुरा बंगला, परळी) हा तरुण सतत त्रास देत होता. उस्मान वारंवार तिला कॉल करत असे, धमक्याही देत होता. या सततच्या त्रासाला निकिता कंटाळली होती. या त्रासाबाबत तिने वडिलांना सांगितले. त्याचे कॉल घेऊ नकोस असा सल्ला तिला वडिलांनी दिला होता आणि ते इतर नातेवाईकांना सोबत घेऊन उस्मानला समजवण्यासाठी त्याच्या घरी जाणार होते. परंतु, त्यापूर्वीच दि.12 जून रोजी आई-वडील पुतण्याच्या लग्नासाठी गेले असताना निकिताने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी आई-वडील परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी उस्मान लतीफ शेख याच्यावर बुधवारी (दि. 24) अ‍ॅट्रॉसिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस करत आहेत.

Tagged