acb office beed

चार हजारांची लाच घेताना तलाठ्यास एसीबीने पकडले

न्यूज ऑफ द डे माजलगाव

माजलगाव : जमिनीच्या सात-बार्‍यावर फेरफार करून खाते फोड करून सही करण्यासाठी चार हजारांची लाच घेताना तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. पुरूषोत्तमपुरी येथे ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आज (दि.1) आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

तालुक्यातील पुरूषोत्तमपुरी येथील शिवारातील एका शेतकर्‍याच्या जमिनीची खातेफोड करण्यासाठी तलाठी अनिल भीमराव जाधव यांच्याकडे रितसर अर्ज केल्यानंतर या जमिनीच्या सातबार्‍यावर फेरफार करून खातेफोडवर सही करण्यासाठी पाच हजारांची लाच मागितली. मात्र तक्रारदाराची पैसे देण्याची इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्यांनी तक्रार दिली. लाचेची मागणीची पडताळणी केल्यानंतर शुक्रवारी (दि.31) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चार हजाराची लाच घेताना तलाठी अनिल भिमराव जाधव यांना पुरुषोत्तमपुरी येथे रंगेहात पकडले. माजलगाव पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला आज (दि.1) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Tagged