POLICE-CORROPTION

लॉकडाऊनमध्ये चकलांबा पोलिसांची वसुली जोमात, कायदा सुव्यवस्था कोमात

क्राईम गेवराई न्यूज ऑफ द डे बीड

मातोरी : लॉकडाउनमध्ये गावात घोटाळणार्‍या युवकांसह नागरीकांना व्यसनाकडे आकर्षीत करून त्यांची जुगार, मटका या माध्यमातून गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरात लूट केली जात आहे. राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल, ढाब्यांसह विविध दुकानामध्ये सर्रास अवैध दारू विक्री करण्यात येत असली तरी लॉकडाऊनला कमाईची संधी मानत चकलांबा पोलिसांनी चक्क कर्तव्यालाच वसुलीची सांगड घातल्याचे चित्र आहे.

जागतिक महामारीमुळे हातचा रोजगार हिरावल्याने कधीकाळचे ‘शहरीबाबू’ मायभुमीत स्थिरावले आहेत. कोरोनाच्या धास्तीने गावात घुटमळणार्‍या युवकांसह मध्यमवर्गीय नागरीकांना व्यसनाधिन बनऊन लुटण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदी-विक्रीस सवलतीसह परवानाधारक दारु विक्रीलाही मुभा देण्यात आली आहे. याचाच गैरफायदा घेऊन राष्ट्रीय महामार्गावरील कोळगाव, तांदळा, तिंतरवणी, मातोरी शिवारातील हॉटेल, ढाबे जुगाराचे अड्डे बनले आहेत. याशिवाय चकलांबा पोलिसांच्या मुकसंमतीने अवैध देशी व बनावट विदेशी दारु विक्री केली जात आहे. रोजगारच्या शोधातील युवकांना जुगाराचे आमिष दाखवून गावच्या गल्ली, बोळा जुगारांचे अड्डे बनले आहेत. त्यातूनच कायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असला तरी आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या धाकाने अनेक तंटे गावच्या वेशीत दबले जात आहेत. त्यातच चकलांबा पोलिसांच्या मुकसंमतीमुळे फुलसांगवी, निमगाव (मा), सावगाव (च), बोरगाव (च) आनंदवाडी, वरंगळवाडी, हाजीपुरसह तालुक्यातील 13 गावखेड्यांसह वाडी तांड्यावरील विविध हॉटेल, ढाबे, दुकानात सर्रास देशी व बनावट विदेशी दारू विक्री केली जात आहे. कोरोनाच्या धास्तीने नागरीकांच्या गरजा कोमात असल्या तरी पोलिसांच्या मुकसंमतीने सुरू असलेल्या जुगार, मटका चालक, अवैध दारु विक्रेत्यांकडून चकलांबा पोलिसांची हप्ता वसुली मात्र जोमात आहे. दरम्यान, चकलंबा पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतू ठाणेप्रमुखांचा भ्रमणध्वनी बंद असल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया समजू शकलेली नाही.

Tagged