POLICE FITING

कंटेनमेंट झोन काढा म्हणत होमगार्डला धक्काबुक्की; आरोपी निघाला पॉझिटिव्ह

अंबाजोगाई कोरोना अपडेट क्राईम

अंबाजोगाई, दि.17 : अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर (पाटोदा) येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाकडून त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला. त्यासाठी बॅरिकेटस लावून प्रवेश निषिध्द करण्यात आला. शिवाय एक पोलीस कर्मचारी, शिक्षक व इतरांच्या त्या ठिकाणी ड्यूट्या देखील लावण्यात आल्या. मात्र अशाच ड्यूटीवरील एका होमगार्डला कंटेन्मेंट झोनमधील पिता-पुत्रांनी मारहाण केल्याचा प्रकार 15 ऑगस्टला घडला. दरम्यान या आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर त्याचा स्वॅब तपासला तेव्हा तो कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

घटनेची थोडक्यात माहिती अशी की, 15 ऑगस्ट रोजी सात ते आठच्या दरम्यान अंबेजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे गृहरक्षक दलाचे जवान कर्तव्यावर असताना कंटेनमेंट झोनमधील दोघे पिता-पुत्र यांनी आम्हाला ये-जा करण्यासाठी अडचण होत आहे. कंटेनमेंट झोन केलेला बॅरिकेट्स काढून टाका म्हणून गृहरक्षक दलातील जवानासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर गृहरक्षक दलातील जवान याने मी हे बॅरिकेट्स काढू शकत नाही आपण येथून ये-जा करू नका, असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील या दोन पिता पुत्राचे समाधान होईना व सदरील होमगार्डला त्यांनी अगोदर शाब्दिक चकमक करत नंतर त्यास गच्चीला धरून धक्काबुक्की, शिवीगाळ करून हुज्जत घातली व शासकीय कामात अडथळा आणला. त्यामुळे गृहरक्षक दलातील जवानांने या दोघा बापलेका विरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन येथे शासकीय कामात अडथळा आणला, शासकीय मालमत्तेचे नुकसान केले व कर्तव्यावर असताना गच्चीला धरून धक्काबुक्की केल्यामुळे अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दोन आरोपी विरुद्ध कलम 353, 427, 323, 506, 34 भादंवी, तसेच कोविड-19 कलम 188, 269, 270 भादंवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीस अटक केल्यानंतर त्याचा नियमाप्रमाणे स्वॅब घेण्यात आला असता तो कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे आता गृहरक्षक दलातील जवानाचा स्वॅब देखील घेण्यात आला आहे. त्याचा अहवाल आज (दि.16) येण्याची शक्यता आहे.
टिप- बातमीत वापरलेला फोटो प्रतिकात्मक आहे.

Tagged