accident

दोन वेगवेगळ्या अपघातात 4 ठार

केज क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

ट्रॅक्टर दुचाकीच्या धडकेत दोन ठार

नेकनूर : भरधाव वेगात निघालेल्या ट्रॅक्टरने समोरून येणार्‍या दुचाकीला धडक दिल्याने या अपघातात दुचाकीवरील दोघे ठार झाले. ही घटना बुधवारी रात्री आठच्या सुमारास सात्रापोत्रा रस्त्यावर घडली. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात नेकनूर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

सुभाष गोविंदराव घोडके व बिभीषण दत्तू पोकळे (रा.दोघेही पोत्रा) हे रात्री आठच्या सुमारास आपली दुचाकी (क्रमांक एम.एच .12 एलई 6466) यावर जात होते. सात्रापोत्रा रस्त्यावर समोरून भरधाव वेगात येणार्‍या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोघेही जागीच ठार झाले. घटनेची माहिती नेकनूर ठाण्याचे फौजदार दिपक रोटे, युनुस बागवान, जायभाये यांना झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. या प्रकरणी आरोपी ट्रॅक्टर चालक शिवदत्त बंकट साखरे रा.चांदणी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पीएसआय विलास जाधव करत आहेत.

पीकअपच्या धडकेत दुचाकीस्वारासह अन्य एक ठार

केज : पिकअप आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तरुण जागीच ठार झाला. तर दुचाकीवरील दुसरा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याचाही मृत्यू केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आसताना गुरुवारी रात्री झाला. हा अपघात केज तालुक्यातील विडा गावालगत असलेल्या तळ्याजवळ गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास झाला.

केज तालुक्यातील बुरंडवाडी येथील धनराज रंगनाथ भोसले (वय 30) व सुशेन जालिंदर भोसले (वय 25) हे दोघे गुरुवारी केजला कामानिमित्त गेले होते. काम आटपून सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून (एम.एच.44 डब्ल्यू 5696) परत गावाकडे निघाले होते. त्यांची दुचाकी केज-विडा रस्त्यावरील विडा गावालगत असलेल्या तळ्याजवळ आली असता विडा येथून घाटेवाडीकडे निघालेल्या पिकअपची (एम.एच. 23 डब्ल्यू 0321) आणि त्यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकीवरील धनराज रंगनाथ भोसले (वय 30) हा तरुण जागीच ठार झाला. तर सुशेन भोसले हा तरुण गंभीर झाल्यामुळे त्याला केज येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता रात्री उशीरा त्याचाही मृत्यू झाला. अपघातात दुचाकीचा चुराडा झाला असून अपघातानंतर पिकअप चालक घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच केजचे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, जमादार बाळकृष्ण मुंडे, पोलीस नाईक धनपाल लोखंडे, पोलीस नाईक श्रीराम चेवले हे घटनास्थळी दाखल झाले होते.

Tagged