SRT HOSPITAL AMBAJOGAI

स्वारातीमधील प्रतिनियुक्तीवर गेलेले डॉक्टर कधी परत येणार?

अंबाजोगाई कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे

जनतेचा सवाल : जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी

खाजा पठाण । अंबाजोगाई

दि.25 : येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना मागील दिड महिन्यापुर्वी प्रतिनियुक्तीवर मुंबई येथे कोरोना रुग्णांची सेवा करण्यासाठी पाठविण्यात आले होते. तत्कालिन परिस्थिती तो निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र डॉक्टरांअभावी कोरोना रुग्णांचे हाल होत असून बाहेर प्रतिनियुक्तीवर गेलेल्या डॉक्टरांना तत्काळ अंबाजोगाईला परत आणण्याची गरज आहे.
सद्यास्थितीत येथील रुग्णालयातील सर्वसामान्य रुग्णाची देखभाल करणार्‍या काही डॉक्टरांनाच कोरोनाने घेरले असल्याचे समोर आले आहे. अत्यावश्यक सेवा देणार्‍या प्रसुती विभागातील दोन ते तीन निवासी डॉक्टर बाधित झाले आहेत. दुसर्‍या एका महत्वाच्या विभागातील डॉक्टरही कोरोनाबाधीत झाले आहेत. त्यामुळे येथील रुग्णसेवेवर त्याचा परिणाम होत आहे. आजही या रुग्णालयात 227 च्या आसपास रुग्ण उपचार घेत आहेत. या शिवाय इतर सर्व प्रकारच्या आजारावरील रुग्णांची देखील देखभाल करावीच लागते. या रुग्णांची अपुर्‍या कर्मचारी, डॉक्टरांमुळे हेळसांड होत आहे. ही संकटाची घडी आहे. त्यामुळे आता शहरातील खासगी डॉक्टरांनी सेवा देण्यासाठी पुढे यायला हवे.
जेव्हा राज्यावर आणि खासकरून मुंबईवर कोरोनाचे संकट होते त्यावेळी बीड जिल्ह्यात रुग्ण नव्हते. त्यामुळे येथील 42 डॉक्टर व इतर कर्मचार्‍यांना मुंबईत विविध रुग्णालयात प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले होते. त्यानंतर त्यातील काही डॉक्टर परत आले मात्र पुन्हा त्यातील काहींना जळगाव येथे पाठविण्यात आले. आता या डॉक्टरांना परत बोलविण्याची गरज आहे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकार्‍यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. शिवाय स्वारातीच्या अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा केला तर हे डॉक्टर तत्काळ जिल्ह्यासाठी उपलब्ध होऊ शकतात. अंबाजोगाईल सर्व पक्षीय नेते, कार्येकर्ते, सामाजिक संस्था यांनी प्रशासनावर त्यासाठी दबाव वाढविणे गरजेचे आहे.

Tagged