सोन्याच्या दुकानातून दागिणे लंपास करणार्‍या चोरट्यांना पुण्यातून अटक

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

परळी शहर पोलीसांची कारवाई

बीड :  तोंडाला मास्क बांधून सोन्याच्या दुकानात काऊंटर वरुन सोन्याची दागिणे लंपास करणार्‍या चोरट्यांचा परळी पोलीसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी दोघांना पुण्यातून कारसह अटक केली असून एक आरोपी फरार आहे. 

     परळी शहरातील नामदेवराव टाक यांचे सोन्याचे दुकान आहे. दि.25 रोजी दुकानातून चोरट्यांनी सोन्याची दागिणे चोरी केले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीसांनी कारचा तपास लावला. त्यानंतर पुणे येथून संदेश महेंद्र शेळके, शेखर हेमराज वाणी, रेखा हेमराज वाणी यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून एक स्विफ्ट कार (एमएच-12 एनयू-9824) व एक तोळा 250 मिलीचे गंठण जप्त केले. त्यांना विश्वासात घेवून विचारपूस केली असता जोस्तना सुरज कछवाये हिच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. जोस्तना फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची (31 ऑगस्ट पर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींवर आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक राहुल धस, शहर पोलीस ठाण्याचे पोनि.हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.प्रदिप एकशिंगे, पोह.बाबासाहेब बांगर, संगिता चक्रे, सुंदर केंद्रे, गोविंद भताने, अमर सरवदे, बाळु कांडनगिरे यांनी केली.

Tagged