mehkari dharan

सीना उपसा योजनेतून पहिल्यांदाच भरले मेहकरी धरण

आष्टी न्यूज ऑफ द डे बीड

दोन दिवसात डाव्या-उजव्या कालव्यातून पाणी सुटणार -आ.बाळासाहेब आजबे

आष्टी, दि.2 : गेल्या वीस दिवसांपासून सीना धरणातील जास्तीचे पाणी मोटारीने उपसा सिंचन योजनेच्या कालव्यातून मेहेकरी धरणात सोडण्यात आले आहे. या धरणातील जास्तीचे वाया जाणारे पाणी आपण शासनाकडे मागणी करून मेहकरी धरणात सोडण्याची परवानगी घेतली. त्यामुळे सीना धरणातील पाण्याने यावर्षी पहिल्यांदाच मेहकरी धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात डाव्या व उजव्या कालव्याद्वारे पाणी सोडून काही छोटे छोटे तलाव, बंधारे ,नाले,खदान भरून घेण्यात याव्यात अशा सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.

आ. बाळासाहेब आजबे यांनी मंगळवारी 1 सप्टेंबर रोजी मेहकरी धरणावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी करीत पाणी पातळी व कालव्याच्या दुरुस्तीबाबत संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते सुनील नाथ, युवा नेते यश आजबे, बाबासाहेब शेंडगे, महादेव जगताप, भाऊसाहेब खराडे, अर्जुन काकडे, सुभाष वाळके, अन्सार भाई, चंद्रकांत जगताप बाबासाहेब भीटे, इंजिनियर पालवणकर उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार आजबे पुढे म्हणाले की दोन दिवसात मेहकरी धरणातून सांडव्यावरून पाणी पाडणार आहे. अजून आपल्या हक्काचे पाणी सीना धरणात शिल्लक असून येणारे पंधरा दिवस आपण पाणी घेऊ शकतो, तशी मागणी आपण जलसंपदामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे. लवकरच त्यास मंजुरी मिळेल. धरण भरल्यानंतर आपण डाव्या व उजव्या कालव्याद्वारे पाणी सोडून परिसरातील लहान तलाव, बंदरे नाले भरून घेणार आहोत. त्यामुळे जमिनीची पाणी पातळी वाढण्यास मदत होईल. नदी पात्रातूनही काही प्रमाणात पाणी खाली जाऊ द्यावे लागणार आहे. त्यामुळे नदी परिसरातील बंधारा भरण्यास मदत होईल. कुकडी- सीना- मेहकरी पाणी उपसा योजना सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच फक्त सीना धरणातून एवढ्या लवकर मेहकरी धरण भरले आहे. यासाठी आपण अगोदरपासूनच अधिकार्‍यांना सूचना दिल्या होत्या त्यामुळे ते शक्य झाले. हे धरण भरल्याचे पाहून आपणास मनापासून आनंद होत आहे. डावा व उजवा कालवा दुरुस्तीचे कामही मशीनद्वारे दुरुस्त करण्यास आजच सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे कालवा व नदी परिसरातील पिंपळगाव, रुई, आनंदवाडी सराटे वडगाव, शिराळ, फत्तेवडगाव, नांदा ,टाकळी, धिरडी, हनुमंत गाव, टाकळी, हिंगणी यासह आदी गावांना याचा फायदा होणार आहे. परिसरातील लोकांनी आवश्यकतेनुसार पाणी उपसा करावा व शक्यतो ठिबकचा मोठ्या प्रमाणात वापर करावा, जेणेकरून पाण्याची बचत होण्यास मदत होईल. मेहकरी धरण येथे आमदार बाळासाहेब आजबे यांनी पाहणी करून अधिकारी व परिसरातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मेहकरी, पिंपळगाव परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tagged