pankaja munde

मुंबईत नव्हे; बीडमध्ये बसुनच काही निर्णय घ्यावे लागतील

राजकारण संपादकीय

बीड : महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुक निमित्ताने पंकजाताई मुंडे यांचे पंख छाटण्याची संधी भाजपने सोडलेली नाही. त्यामुळे पुढे भाजपाची रणनिती नेमकी काय असणार हे सर्वांना कळून चुकले आहे. पण हीच बाब आता पंकजाताई मुंडे यांना समजण्याची गरज असून त्यांनी मुंबईत बसून नव्हे तर बीडमध्ये राहून आपली पाळंमुळं आगोदर घट्ट करायली हवीत. अन्यथा मुंडे-खडसे यांचं काय करायचं हे भाजपाने ठरवून टाकलेलं आहे. त्यांना त्या स्वतःच पोषक वातावरण तयार करीत आहेत असे चित्र आता तयार झाले आहे, पण हे त्यांना सांगणार कोण अन् बोलणार कोण?

पंकजाताई मुंडे म्हणजे मास लिडर. महाराष्ट्रातील जवळपास 28 विधानसभा मतदारसंघात त्यांची निर्णायक मते आहेत. पण सत्ता नसली की चांगल्या चांगल्यांची वाताहत झाल्याचे आपण बघीतलेले आहे. पंकजाताईंची वेळ अजुनही गेली नाही. पण असंच चालत राहीलं तर ती जावू शकते. पण हे त्यांना सांगणार कोण अन् बोलणार कोण?

त्याचं एक एक राजकीय गणित बिघडत जाण्यास त्यांचा स्वतःचा स्वभाव कारणीभूत आहे. पक्षापेक्षा आपण मोठे हे कायम त्यांनी पक्षाला दाखवून देण्याचा प्रयत्न केला. नेमकं तेच भाजपला नकोय. त्याची सुरुवातच झाली ती मुळ ‘पुन्हा संघर्ष यात्रा’ यातून. कारण 2014 च्या विधानसभा निवडणुका फक्त मोदी यांच्या नावावर जिंकायच्या असं त्यावेळी भाजपचं धोरण ठरलेलं होतं. मात्र या धोरणाला विरोध करीत पंकजाताईंनी संघर्ष यात्रा काढलीच. जे यश मोदी यांच्या नावावर मिळवायचं होतं ते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या सहानुभूतीवर मिळाले असं चित्र महाराष्ट्रात उभं राहीलं. त्यामुळे केंद्रात अमित शहा हेही त्यांच्या कार्यपध्दतीवर नाराज झाले होते. 2014 मध्ये मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून सतत त्यांना कुठे न कुठे अडणीत आणण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला. चिक्की घोटाळा असो की मोबाईल घोटाळा. सगळ्या प्रकरणांमध्ये त्यांना अडकवून ठेवण्यात भाजपला यश आले होते. पण तरीही त्यांनी राजकीय समजुतदारपणा दाखवून पक्षांतर्गत विरोधकांशी जुळवून घेणे सोईचे समजले नाही. पण हे त्यांना सांगणार कोण अन् बोलणार कोण?

अखंड वंजारा समाजाचे श्रध्दास्थान असलेले श्री क्षेत्र भगवानगडामुळे त्यांच्या मागे संपूर्ण वंजारा समाज मोठ्या शक्तीनिशी उभा राही त्याच भगवानगडाच्या महंतांशी त्यांनी पंगा घेतला. त्यातून त्यांनी प्रति भगवानगड सावरगाव घाट येथे उभारलाही. ही त्यांची खरे तर मोठी चूक आहे. भलेही महंताशी तुमचा वाद होता. पण भगवानगडावर तुमचं येणं-जाणं कायम असायला हवं होतं. याच भगवानगडावर मंत्री धनंजय मुंडे यांना महंतामुळे दगड झेलावे लागले. पण तेच महंत धनंजय मुंडे यांना भगवानगडावर येण्यासाठीचे निमंत्रण घेऊन गेले. हे धनंजय मुंडे यांच्या वागण्यातील लवचिकपणाचे फळ होते. तोच लवचिकपणा सध्या पंकजाताईंमध्ये येणं गरजेचं आहे. पण हे त्यांना सांगणार कोण आणि बोलणार कोण? 

एकदा त्यांनी त्यांच्याबद्दल मी मुख्यमंत्री नसले तरी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे असा उल्लेख केला. त्यामुळे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्यावर अवकृपा झाली. तेव्हापासून त्यांनी पंकजाताईंचं जमेल तिथं मानसिक व राजकीय खच्चिकरण केलं. प्रा. राम शिंदेंना जलसंधारण खातं देणे हा त्याचाच भाग. पुढे बीड जिल्ह्यात आ.विनायक मेटे यांनाही फडणवीसांनी ताकद दिली. पण या ताकदीमुळे पंकजाताई प्रचंड आक्रमक झाल्या. एकदा तर त्यांनी बीड जिल्ह्यात आलेली देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा अर्धवट सोडून बीड शहर गाठले होते. राजकारणात कुणाचा कितीही राग आला तरी तो असा जाहीरपणे व्यक्त करणे धोक्याचेच असते. त्याचा अनुभव पंकजाताई घेत आहेत. पण हे त्यांना सांगणार कोण? बोलणार कोण? 

परळी विधानसभेत पंकजाताई अडचणीत आहेत हे त्यांना प्रत्येकजण सांगत होता. परंतु लोकसभा निवडणुकीत खा.डॉ.मुंडे यांना परळीतून मिळालेली लीड यामुळे त्या अति आत्मविश्वासात गेल्या होत्या. कुणाचंच ऐकून न घेणं हेच त्यांना घातक ठरत आहे. त्यामुळेच धनंजय मुंडे यांच्याकडून त्यांना थोडा थोडका नव्हे 32 हजारांनी पराभव पहावा लागला. या पराभवानंतर त्यांनी आत्म परिक्षण करणं गरजेचं असतानाही त्या मुंबईत निघून गेल्या. पुन्हा एकच दिवस परळीत गोपीनाथ गडाच्या कार्यक्रमाला आल्या. पण पुन्हा निघून गेल्या. त्यानंतर गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचं कार्यालय मुंबईत सुरु करायचं म्हणून ज्या निघून गेल्यात ते आजपर्यंत परत आल्याच नाहीत. ही त्यांची चुकच आहे. पण हे त्यांना सांगणार कोण आणि बोलणार कोण? 

बीडमध्ये येण्यासाठी त्यांनी लॉकडाऊनचं निमित्त केलं असलं तरी परळीतील जनतेवर त्यांचा जास्तीचा राग असल्याचे दिसत आहे. आज देश विदेशातून, राज्यातून लोक बीड जिल्ह्यात येतच आहेत. त्यामुळे दोन्ही मुंडे भगीनींनी ठरवलं असतं तर बीड जिल्ह्यात येणं त्यांच्यासाठी अवघड काम नव्हतंच. ऊसतोड मजुरांसाठी त्या मुंबईतून आवाज उठवत होत्या. पण त्याचवेळी सुरेश धस, धनंजय मुंडे हे प्रत्यक्ष ऊसतोड मजुरांसाठी काम करताना दिसत होते. त्यामुळे ताई मुंबईत बसून ऊसतोड मजुरांचा प्रश्न सुटणार नाही, त्यासाठी आधी त्यांच्या फडावर जाऊन त्यांच्या जगण्याशी एकरूप व्हावं लागेल. तेव्हा त्यांचे प्रश्न सुटण्यासाठी तळमळीने प्रयत्न होतील. पण हे त्यांना सांगणार कोण अन् बोलणार कोण? 

पंकजाताई हे कटू पण सत्य… 
पंकजाताईंना कुणी सल्ला दिलेला आवडत नाही. पण तरीही त्यांच्या भल्यासाठी कुणीतरी सल्ला दिला पाहीजे. त्यांनीही तो ऐकला पाहीजे. राजकारणात तुम्हाला मास लिडर म्हणून पुन्हा पाय रोवून उभं रहायचं असेल तर त्यासाठी बीड जिल्ह्यात परत यावं लागेल. गोपीनाथ मुंंडे प्रतिष्ठानचं कार्यालय ज्या प्रमाणे मुंबईत केलं गेलं तसंच कार्यालय बीड शहरात करून तेच कामकाजाचं मुख्यालय करावं लागेल. मंत्री धनंजय मुंडे यांनी कामकाजाची जी पध्दत ठेवली आहे ती पाहता भविष्यातही पंकजाताईंना परळी मतदारसंघात संधी दिसत नाही. हे ऐकणं, वाचणं जड जात असलं तरी तीच परिस्थिती आहे. त्यासाठी त्यांना बीडमध्ये बसून माजलगाव, आष्टी विधानसभा मतदारसंघाचा पर्याय चाचपडून पहावा लागणार आहे. आपल्या आजुबाजुला असलेली मंडळी खर्‍या परिस्थितीपासून पंकजाताईंना अंधारात ठेवत आहे. आगोदर या लोकांना बाजुला करावं लागेल. हे असंच करावं लागेल तरच पंकजाताई पुन्हा एकदा राजकारणात आपल्यातील ताकदीचा परिचय महाराष्ट्राला देऊ शकतात. शेवटचा मुद्दा सांगतो, मुंबईत बसुनही आमदारकी मिळत नसेल तर बीडमध्ये बसून ती मिळवली तर अधिक प्रभावी राहील.

Tagged