बीड दि. 10 : अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर पाडळसिंगी टोलनाका परिसरात पकडला. यावेळी टिप्पर मालकाने मंडळाधिकाऱ्याच्या गाडीला धडक देऊन टिप्पर पळून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख जुनैद चाँद (रा.माळापुरी ता.जि. बीड) असे आरोपीचे नाव आहे. मंडळअधिकारी अमोल सुधाकर कुरुलकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी तहसीलदार सचिन खाडे व इतर कर्मचारी पाडळसिंगी टोलनाका येथे वाळू वाहतुकीचा परवाना चेक करत होते. त्यानंतर काही कामानिमित्त तहसीलदार गेवराईला गेले व पावत्या चेक करणे सुरू ठेवा असे सांगितले. यावेळी वाळूने भरलेला (एमएच 23 डब्लू -4299) टिप्पर आला. त्यास अडवून चालकाकडे पावतीची चौकशी केली. संपलेली पावती आढळुन आली. त्यामुळे सदरील टिप्पर कारवाईसाठी घेऊन जाणार होतो. तेवढ्यात तिथे एका काळ्या स्कार्पिओ (एमएच 23 एडी-5990) मधून आले व माझी गाडी असल्याचे सांगत गाडी पळवली. टिप्परचा पाठलाग केला असता शेख जुनैद चाँद व चालकाने आम्हाला जीवे मारण्याच्या उद्देशाने आमच्या गाडीला धडक दिली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात कलम 307, 353, 379, 427 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.