amar naikwade faruk patel

कलेक्टर साहेब, डोईफोडे कडून होणारा रेमडेसिवीर काळाबाजार रोखा, नसता आम्ही कायदा हातात घेऊ!- पटेल, नाईकवाडे

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

सर्वसामान्यांच्या जीवांशी खेळणार्‍या डोईफोडेला बदलून दुसर्‍या अधिकार्‍याची नेमणूक करा

बीड – बीड शहरात जो रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा काळा बाजार सुरू आहे, तो ड्रग इंस्पेक्टर डोईफोडे यांच्या संमतीने व सहकार्याने सुरू आहे. आठ दिवसापूर्वी याबाबत आम्ही आपल्याकडे तक्रार दाखल केली होती. ज्या दिवशी तक्रार दाखल केली त्याच दिवशी संध्याकाळी ड्रग इंस्पेक्टर डोईफोडे यांच्या संगनमताने लाइफलाइन मेडिको येथून रुग्णाच्या नातेवाईकांना 5400 रुपयांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन विक्री होत असल्याची तक्रार बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली. सामान्य जनतेच्या जिवाशी खेळणारा डोईफोडे नावाचा अधिकारी एवढा खुलेआम काळाबाजार करत असेल व आपले प्रशासन मूग गिळून गप्प बसणार असेल तर सर्वसामान्य रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल व तो लोक हितासाठी आम्ही घेऊ ही. जनतेचा रोष टाळायचा असेल तर रेमडेसिवीर इंजेक्शन्स वाटपाच्या कामी ड्रग इंस्पेक्टर डोईफोडे ऐवजी दुसर्‍या अधिकार्‍याची नेमणूक करावी अशी विनंती वजा सूचना जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात गटनेते फारुख पटेल व अमर नाईकवाडे यांनी केली आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी आपण पुन्हा डोईफोडे नावाच्या अधिकार्‍याची नेमणूक केली. यावर कहर म्हणजे इंजेक्शन वाटपाचे कामही या डोईफोडे महाशयांनी त्याच लाईफलाईन मेडिको दुकानातून सुरू केले. इंजेक्शन वाटप तर सोडून द्या साधे कागदपत्रे देण्यासाठी हा अधिकारी सर्वसामान्य रुग्णांच्या नातेवाईकांना उपलब्ध होत नाही. त्याला फोन केला असता त्याचा मोबाईलही बंद असतो. हा सगळा प्रकार क्लेशदायक आहे. आपण प्रशासनाचे प्रमुख आहात एवढ्या महामारीच्या व संवेदनशील काळात डोईफोडे सारखे निगरगट्ट अधिकारी हजारो सर्वसामान्य जिवांशी खेळत असतील तर अशा अधिकार्‍यांच्या विरोधात जनक्षोभ तयार होऊन एखादी दुर्दैवी घटना घडेल व यास सर्वस्वी आपण जबाबदार असाल. डोईफोडे व त्यांनी ठरवून दिलेले मेडिकलचे दुकान यांची मिलीभगत असल्यामुळे यापूर्वी लाईफ लाईन मेडिको सह ज्या मेडीकल दुकानांमधून रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री करण्यात येत होती ती सर्व दुकाने टाळून दुसर्‍या दुकानांमधून व डोईफोडे ऐवजी दुसरा अधिकारी नेमून रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री करावी म्हणजे साठेबाजीला व काळाबाजाराला आळा बसेल असेही शेवटी गटनेते फारुख पटेल व अमर नाईकवाडे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

जिल्हाधिकार्‍यांचा वचक नसेल तर लोकं मरतील.
जिल्हाधिकारी साहेब आपण तळमळीने काम करत आहात पण आपल्या खालच्या अधिकार्‍यांवर आपला वचक नसेल व तो राजरोस काळाबाजार करून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवांशी खेळत असेल तर आपला चांगुलपणा शहराच्या काय कामाचा? असाच प्रकार सोमवारी रात्री एका राजकीय व्यक्तीच्या बालिशपणामुळे खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा खंडित करण्याबाबत झाला होता. खाजगी रुग्णालयांना सोमवारी रात्री व मंगळवारच्या पहाटे आपण ऑक्सीजन सिलेंडर वेळेवर उपलब्ध करून दिले नसते तर शंभरच्यावर रुग्णांचा मृत्यू बीड शहरामध्ये झाले असते. नशीब बलवत्तर म्हणून ही भयंकर दुर्घटना टळली. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शन्स व ऑक्सिजन पुरवठ्यावर जिल्हाधिकारी म्हणून आपला वचक रहावा व यात पारदर्शकता यावी असेही शेवटी गटनेते फारुख पटेल व अमर नाईकवाडे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Tagged