परळीच्या थर्मलमधील प्लांट केला शिफ्ट
बीड : परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रातील ऑक्सिजन प्लांट अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात शिफ्ट करून आज (दि.२७) कार्यान्वित करण्यात आला आहे.
अंबाजोगाईत हा प्लांट शिफ्ट करून कार्यान्वित करण्यात येत असल्याने आता ऑक्सिजनची ‘महानिर्मिती’ होणार आहे. या ऑक्सिजन प्लांटचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्हर्च्युअल कार्यक्रमात लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे अंबाजोगाईसह जिल्ह्यात ऑक्सिजन मुबलक प्रमाणात मिळणार आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून कार्यान्वित करण्यात आलेल्या या प्लांटमुळे दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या प्लांटमधून रुग्णालयास आवश्यक ऑक्सिजनची 40 टक्के निकड पूर्ण होईल, तर उर्वरित पुरवठा विविध माध्यमातून सुरू आहे. उर्वरित 60 टक्क्यांसाठी एक प्लांट जिल्हा नियोजन मधून उभा करण्यासंबंधी कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. तसेच, हा प्लांट कार्यान्वित केल्याबद्दल राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे आभार मानले.