remdesivir

रेमडिसीवीरचा काळाबाजार करणार्‍या आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

कोरोना अपडेट क्राईम न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा

बीड दि.27 : जिल्ह्यात रेमडेसिविरचा तुटवडा असताना आणि एका इंजेक्शनसाठी रुग्णांचे नातेवाइक भटकत असताना दुसरीकडे काळाबाजार जोरात सुरू आहे. चक्क 22 हजार रुपयांना एक इंजेक्शन विकण्याचा प्रकार 23 एप्रिल रोजी रात्री बीडमध्ये समोर आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले. या तिघांना न्यायालयाने 27 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यांनी 27 एप्रिल रोजी जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. परंतु तिघांचाही जामीन न्यायालयाने फेटाळला असून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
कोविड रुग्णांसाठी आवश्यक रेमडेसिविर इंजेक्शन मिळवण्यासाठी सध्या रुग्णांच्या नातेवाइकांची मोठी धडपड सुरू आहे. रांगा लावून लोक रेमडेसिविरसाठी वाट पाहत आहेत. हीच संधी साधून काही लोक काळाबाजार करताहेत. मूळ किमतीपेक्षा अधिक दराने विक्री होत आहे. शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास शिवाजीनगर पोलिसांना एका व्यक्तीने असा काळाबाजार होत असल्याची माहिती दिली. पोलिसांनी माने कॉम्प्लेक्स परिसरात सापळा लावून इंजेक्शन विक्री करताना संतोष प्रभाकर नाईकवाडे (रा. चाणक्यपुरी) याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर चौकशीतून दत्ता महादेव निर्मळ (रा. पिंपळगाव, ता.गेवराई) आणि प्रकाश परमेश्वर नागरगोजे (रा. क्रांतीनगर) यांनाही अटक केली गेली. शनिवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. 27 एप्रिल रोजी त्यांनी जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. परंतु न्यायालयाने जामीन फेटाळत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपअधीक्षक संतोष वाळके, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोनि.साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.अमोल गुरले हे करत आहेत.

Tagged