पालकमंत्री धनंजय मुंडेंचा आरोग्य यंत्रणेला बूस्टर डोस
बीड : जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न आटोकाट पणे सुरू असून, आज त्यांनी जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला ऑक्सिजनचा मोठा बूस्टर प्राप्त करून दिला आहे. ना.मुंडेंच्या माध्यमातून आज जिल्हा आरोग्य विभागाला 371 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स प्राप्त झाले आहेत.
मागील आठवड्यात ना. मुंडेंनी बीड जिल्हा रुग्णालयास 30 बायपॅप मशिन्स सह 29 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स उपलब्ध करून दिले होते. त्यानंतर आज प्राप्त 371 कॉन्संट्रेटर्स सह आता कॉन्संट्रेटर्सची एकूण संख्या 400 झाली आहे. हे कॉन्संट्रेटर्स जिल्हा रुग्णालयासह अन्य शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यकतेनुसार वितरित करण्यात येणार आहेत. हवेतून ऑक्सिजन वेगळा करण्याची क्षमता असलेले ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स म्हणजे या कठीण परिस्थितीत कोरोना बाधित रुग्णांसाठी संजीवनीच म्हणावी लागेल, अशी परिस्थिती सध्या जिल्ह्यासह राज्यभरात आहे. त्यामुळे ना. मुंडेंच्या माध्यमातून जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झालेले हे 371 व पूर्वीचे 29 असे 400 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स अनेक कोरोना बाधित रुग्णांचे जीव वाचविण्याच्या कामी सहाय्यक ठरणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुर्यकांत गित्ते यांनी म्हटले आहे. दरम्यान ऑक्सिजन तुटवडा जाणवत असल्याच्या नवनवीन बातम्या रोज प्रसिद्धीस येत असताना जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झालेले 400 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स हा दरम्यानच्या काळातील मोठा दिलासा म्हणावा लागेल.