एक नव्हे दोन खुनातील मास्टर माईंड भैय्या गायकवाड जेरबंद!

क्राईम बीड मराठवाडा शिरूर

नाशिक येथून घेतले ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखेचे भारत राऊत यांची कामगिरी
बीड/शिरुर दि.1 : शिरुर येथील सोनाराच्या खुनातील मास्टर माईंड ज्ञानेश्वर उर्फ भैय्या गायकवाड हा एका नव्हे तर दोन खुनातील मास्टर माईंड असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या भैय्या गायकवाडला मंगळवारी (दि.1) पहाटेच्या सुमारास नाशिक येथून जेरबंद करण्यात आले. ही कारवाई नाशिक पोलीसांच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख भारत राऊत यांनी केली.

मागील आठवड्यात शिरुर येथील सराफा व्यापारी विशाल कुल्थेचे भैय्या गायकवाडने मित्रांच्या मदतीने अपहरण करुन सोन्यासाठी त्याचा खून केला. या प्रकरणात धीरज मांडकर व केतन लोमटे यांची नावे समोर आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांच्या मुसक्या आवळल्या होत्या. मात्र मुख्य आरोपी भैय्या गायकवाड फरार होता. दरम्यान दोन्ही आरोपींना शिरुर न्यायालयाने 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. तेव्हापासून भैय्या गायकवाड हा पोलीसांना गुंगारा देत होता. त्याला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक तैनात करण्यात आले होते. अखेर मंगळवारी दि.1 रोजी पहाटे भैय्या उर्फ ज्ञानेश्वर गायकवाड यास नाशिक येथून जेरबंद करण्यात आले. त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली. यावेळी त्याने आणखी एका महिलेचा खून केल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.भरत राऊत व त्यांच्या टिमने केली. यामध्ये त्यांना नाशिक पोलीसांनी मदत केली.

सोने, चांदी केली जप्त
शिरुर येथील सोनाराचा सोन्यासाठी भैय्या गायकवाडने खून केला होता. त्याकडील सोने व चांदी घेऊन तो फरार झाला होता. पोलीसांनी त्याकडून मोठ्या प्रमाणात सोने व चांदी जप्त केली आहे.

नाशिकमध्ये पत्नीसोबत होता वास्तव्यास
घटनेनंतर भैय्या गायकवाड पोलीसांना गुंगार देत फिरत होता. त्याच्या मागावर स्थानिक गुन्हे शाखेची पथके नगर, पाथर्डी, औरंगाबाद, नांदेड यासह आदी जिल्ह्यात मागावर होती. अखेर नाशिक येथे पत्नीसोबत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. नाशिकमधील अरिंगळे मळा परिसरातून त्यास ताब्यात घेतले.

काय आहे राहुरी येथील खून प्रकरण
राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नगर ते मनमाड रोडवर 15 मार्च 2021 रोजी एका महिलेचा मृतदेह आढळला. सदरील महिलेच्या डोक्यात दगड घालून क्रुरपणे हत्या करण्यात आली होती. पुरावा नष्ट करण्याच्या हेतून चेहर्‍याचा भाग छिन्नविछिन्न करण्यात आला होता. त्यामुळे पोलीसांना मयताची ओळख पटली नाही. या प्रकरणी अज्ञाताविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला व ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले होते. नाशिक येथून भैय्या गायकवाड यास अटक केल्यानंतर पोनि.भरत राऊत यांनी त्याची चौकशी केली. त्याचे दोन विवाह झाले असल्याची त्यांना माहिती होती. त्यावरुन राऊत यांनी पत्नीसंदर्भात विचारणा केली. याबद्दल सांगताना भैय्या गायकवाडवर संशय निर्माण झाला. त्यास पोलीसी खाक्या दाखवताच त्याने केतन लोमटे या मित्राच्या मदतीने शितल भांबरे (रा.नाशिक) हिचा राहुरी येथे डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली दिली.

Tagged