datta devsthan ambajogai

पापा मोदीच्या बंधुने अंबाजोगाईतील देवस्थानाची जमीन ढापली

अंबाजोगाई न्यूज ऑफ द डे बीड

आ.नमिता मुंदडांची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

बीड : अंबाजोगाई नगरपालिकेतील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आल्यानंतर आता मोदी कुटुंबातील सदस्याचा आणखी एक कारनामा चव्हाट्यावर आला आहे. अंबाजोगाईचे नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे लहान बंधू भूषण मोदी यांच्या नावे देवस्थानाच्या जमीनीचा सातबारा असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. प्लॉटिंग असलेल्या या जमीनीचा सध्या दोन एकरचा सातबारा असल्याचे कळतेय. पण प्रत्यक्षात खूप मोठा जमीन घोटाळा यामध्ये दडल्याची शक्यता आहे.

आमदार नमिता मुंदडा यांनी याप्रकरणी थेट जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याकडे मंगळवारी (दि.15) तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, अंबाजोगाई येथील सर्वे नं.335/1 ही जमीन थोरले देवस्थानाची आहे. या सातबारावर ईनामी जमीन असा उल्लेख असलेली सातबारा भूषण मोदी यांच्या नावे आहे. या जमिनीच्या खरेदी विक्रीची अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी तसेच भू सुधारचे उपजिल्हाधिकारी यांच्याकडून कसल्याही प्रकारची परवानगी मिळालेली नाही. तरीही बेकायदेशीररित्या खरेदी विक्रीचा व्यवहार झालेला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच, सदर जमीनीचा नजराणा दुय्यम निबंधक यांनी काढून दिलेल्या मुल्यांकनानुसार भरलेला नाही. तसेच, अभिन्यासामध्ये अ‍ॅमिनिटी प्लॉट ठेवला नाही म्हणून अभिन्यास रद्द झाला आहे. याप्रकरणी स्वतः जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी लक्ष घालून बेकायदेशिररित्या केलेल्या जमीन व्यवहाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी केली आहे.

अंबाजोगाईतील देवस्थान जमीनीबाबत तक्रार प्राप्त झाली असेल तर त्याअनुषंगाने चौकशी करू. योग्य ती कार्यवाही केली जाईल.

-प्रकाश आघाव पाटील, उपजिल्हाधिकारी, भू-सुधार, बीड

Tagged