chhed chhad

विस्तार अधिकारी महिलेची छेडछाड; पतीकडून गटशिक्षणाधिकार्‍याची धुलाई

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीडमधील प्रशिक्षणादरम्यान घडलेला प्रकार

बीड : जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी आणि विस्तार अधिकारी यांचे ‘बाला’ या कार्यक्रमाचे प्रशिक्षण बुधवारी बीड शहरातील स्काऊट भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षण कार्यक्रमास येणार्‍या एका महिला विस्तार अधिकार्‍याची तिच्या पतीसमोर एका गटशिक्षणाधिकार्‍याने रस्त्यात दोन ते तीन वेळा छेडखानी केली. त्यानंतर चिडलेल्या पतीने संबंधीत गटशिक्षणाधिकार्‍याची चांगलीच धुलाई केल्याचे वृत्त आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार विस्तार अधिकारी असलेली महिला आपल्या पतीसमवेत बीडकडे दुचाकीवरून येत होती. पाठीमागून चारचाकीत आलेल्या गटशिक्षणाधिकार्‍याने या महिला कर्मचार्‍याच्या गाडीला दोन ते तीन वेळा ओव्हरटेक केला. आपली छेडखानी होत असल्याची बाब संबंधीत महिलेने आपल्या पतीला सांगितली. त्यानंतर पतीने विस्तार अधिकारी पत्नीला स्काऊंट भवन येथे प्रशिक्षणासाठी सोडले. आणि बाहेर संबंधीत गटशिक्षणाधिकार्‍याची वाट बघू लागले. गटशिक्षणाधिकारी येताच विस्तार अधिकारी महिलेच्या पतीने त्याला सारखे सारखे ओव्हरटेक का करत होता, याचा जाब विचारत त्याची चांगलीच धुलाई केली. या धुलाईनंतर संबंधीत गटशिक्षणाधिकारी प्रशिक्षणाला देखील हजर नव्हता. झाल्या प्रकाराची माहिती प्रशिक्षणाच्या सभागृहात मिळाल्यानंतर सर्वत्र याचीच चर्चा रंगली होती.

संबंधीत अधिकारी महिलेच्या पतीने पोलीसात धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बदनामीच्या भितीपोटी अद्याप कुठल्याही ठाण्यात याची तक्रार नोंद नव्हती.

गटशिक्षणाधिकार्‍याला मार महत्वाचाच होता
संबंधीत गटशिक्षणाधिकारी अतिशय वादग्रस्त आहे. तरीही त्याच्याकडे त्या पदाचा प्रभारी चार्ज देण्यात आला आहे. अनेक महिला अधिकार्‍यांना आणि कर्मचार्‍यांना त्याचा त्रास होता. मात्र बदनामीच्या भितीने कुणी समोर येत नाही. या प्रकरणात गटशिक्षणाधिकार्‍याला मिळालेला प्रसाद महत्वाचाच आहे. पण तरी देखील कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. संबंधीत महिला अधिकार्‍याला विश्वास देऊन त्यांच्याकडून लेखी जवाब मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी घ्यायला हवा. असे न झाल्यास ‘काळ सोकावण्याची’ जास्त भिती आहे.

Tagged