accident

पुजारी, ग्रामसेवक व शेतकरी अपघातात ठार!

क्राईम गेवराई धारूर न्यूज ऑफ द डे बीड वडवणी


वडवणी, धारुर व गेवराई तालुक्यातील घटना
बीड
: दि.16: जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. वडवणी, धारुर व गेवराई तालुक्याच्या हद्दीत या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या अपघातात ग्रामसेवक, पुजारी आणि अन्य एकाला प्राण गमवावे लागले.

ट्रॅव्हल्सच्या धडकेत ग्रामसेवकाचा मृत्यू
वडवणी : बीड-परळी महामार्गावर वडवणी परिसरातील नहार हॉटेल समोर कार (एमएच 02 सिपी 5226) व टॅ्रव्हल्सची (एमएच 29 व्ही 7227) समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात कारमधील ग्रामसेवक राजेंद्र मुंडे यांचा जागीच मृत्यू झाला. राजेंद्र मुंडे हे बीड पंचायत समितीत कार्यरत होते. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये कारचा चुराडा झाला. या प्रकरणी वडवणी पोलीसात नोंद करण्यात आली आहे.

कारच्या धडकेत पुजार्‍याचा मृत्यू
धारुर : येथील शिवाजी चौकामध्ये मारूती किसन साबळे यांच्या दुचाकीला भरधाव कारने जोराची धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते हनुमान मंदिरात पुजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली एक मुलगा असा परिवार आहे.

स्कार्पिओच्या धडकेत
एक ठार, एक जखमी

गेवराई : तालुक्यातील गढीजवळ बुधवारी सायंकाळी 6 च्या सुमारास भरधाव स्कर्पिओने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवरील अर्जून महादेव शेंदरे (वय-40 रा.राजंणी) याचा जागीच मृत्यु झाला. तर बाबासाहेब नामदेव शिंदे (वय-38 रा.शिंदेवाडी) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर बीड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Tagged