suresh dhas

बीड जिल्ह्याचे दुसरे गोपीनाथ मुंडे म्हणजे आ.सुरेश धस…

न्यूज ऑफ द डे बीड राजकारण

मुद्देसूद…

बालाजी मारगुडे । बीड
दि. 29 : केदारनाथमध्ये आलेला महाप्रलय असो की आष्टीत बिबट्याने घातलेला धुमाकूळ… जनावरांना होत असलेला घटसर्प असो की माणसांना होणारा कोरोना… ऊसतोड मजुरांचा विषय असो की छावणी चालकांच्या बिलाचा… घरकुलाचा विषय असो की वाळुचा… पीक कर्जाचा विषय असो की कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा… ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय असो की मराठा समाजाच्या आरक्षणाचा… प्रत्येक विषयावर अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन त्यांचा पाठींबा मिळवणारे नेतृत्व म्हणजे आ.सुरेश धस… आज त्यांनी काढलेल्या मराठा समाजाच्या आरक्षण मोर्चात सर्वच समाजबांधवांनी हजेरी लावली. याची दखल राज्यातील भाजपा नेत्यांना न घ्यावी लागली तरच नवल… गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर बीड जिल्ह्यातील लोकांना आपलं वाटणारं, आपल्यासाठी तळमळीने जमीनीवर उतरून संघर्ष करणारं, प्रचंड लोकप्रिय नेतृत्व म्हणून लोक आता आ.सुरेश धस यांच्याकडे आशेने पाहू लागले आहेत.

मराठा आरक्षण मोर्चासाठी सुरेश धसांनी प्रचंड गर्दी जमवली होती…


आ.सुरेश धस म्हणजे कामाची आवड असणारं व्यक्तीमत्व. अंगात प्रचंड ऊर्जा आणि सळसळता उत्साह. मराठा आरक्षण मोर्चा काढण्याची घोषणा त्यांनी 24 जून रोजी केली होती. आणि 28 जुनला भव्य असा मोर्चा काढला. हा मोर्चा भाजपचा अधिकृत मोर्चा असल्याची घोषणा देखील त्यांनी केली होती. त्यामुळे सहाजिकच या मोर्चाला ‘राष्ट्रीय नेतृत्व’ हजर राहील, अशी अपेक्षा होती. परंतु राष्ट्रीय नेतृत्वाकडून मोर्चाला शेवटपर्यंत ‘ग्रीन सिग्नल’ मिळालाच नाही. मात्र कुणाचा तरी सिग्नल घेऊन मोर्चा काढणार्‍यांपैकी धस नाहीत. त्यामुळे त्यांनी आ.लक्ष्मण पवार यांना सोबत घेतले. पवार यांच्या बरोबरच त्यांनी जिल्ह्यातील सर्वच भाजपा आमदार आणि नेत्यांना मोर्चाला उपस्थित राहण्याची विनंती केली होती. त्यांची विनंती माजी आ.आर.टी.देशमुख यांनी कुणाच्या ग्रीन सिग्नलशिवाय मान्य केली आणि मोर्चात उपस्थित राहीले. मात्र भाजपाचे इतर पदाधिकारी ‘राष्ट्रीय’ नेतृत्वाकडून सिग्नल न मिळाल्याने शेवटपर्यंत द्विधा मनस्थितीत होते. शेवटी भाजपामधील अनेक मराठा समाजाच्या पदाधिकार्‍यांनी ‘शेपूट’ घालून घरीच बसणे पसंत केले. विशेष म्हणजे हेच नेते ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी रस्त्यावर मांड्या घालून बसलेले जिल्ह्याने पाहीले. पक्षातीलच दुसर्‍या राजकीय स्पर्धकाशी ते स्पर्धा करीत होते. अगदी आ.धस, आ.लक्ष्मण पवार देखील या आंदोलनात होते. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला कुणाचाच विरोध नाही. सगळ्यांनी मन मोठं करून चक्काजाम आंदोलन यशस्वी केले. आता वेळ होती मराठा समाजाच्या पाठीमागे उभे राहण्याची. आरक्षणावर काढल्या जाणार्‍या आजच्या मोर्चाची… पण प्रश्न हा उरतो की मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय आलाकीच राष्ट्रीय नेत्यांसह इतरांची मनं इतकी संकुचित का होत असावीत? मागेही आ.मेटे यांनी मोर्चा काढला. हा मेटेंचा मोर्चा म्हणून त्यांना विरोध केला. तो मोर्चा निघू नये म्हणून भाजपच्या जिल्हाध्यक्षांसह इतर पदाधिकार्‍यांनी कंबर कसली होती. अगदी मराठा क्रांती मोर्चात उभे दोन गट पाडले. हरकत नाही तो मेटेंचा मोर्चा होता असे आपण मान्य करू. पण आज निघालेला मोर्चा हा तर भाजपचा मोर्चा होता ना? मग या मोर्चात भाजपचे पदाधिकारी का दिसले नाहीत? नाक वर करून मेटेंच्या मोर्चाला विरोध करणारे आजच्या मोर्चात उपस्थित असायलाच हवे होते. का तुम्हाला गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे असे वाटत नाही? जिथे समाजाच्या हिताचा प्रश्न असतो तिथे पक्ष, राजकारण, नेत्याला काय वाटेल असले फालतू विचार बाजूला सारून सर्वांनी हातात हात देऊन लढाई करायची असते. मात्र नेहमी ‘ताटाखालचे मांजर’ व्हायची सवय लागलेल्या मराठा समाजाच्या पुढार्‍यांना या मोर्चात देखील कुणाला तरी विचारून हजेरी लावायची होती. या नेत्यांनी स्वतःचा थोडा तरी स्वाभीमान समाजाच्या हितासाठी शिल्लक ठेवायला हवा होता. जिल्ह्यातील ज्या आमदार, खासदारांवर आणि भाजपच्या पदाधिकार्‍यांवर कुणाचा तरी रिमोट चालतो. रिमोटवर चालणार्‍या त्या लोकांकडून मराठा समाजाने आरक्षण मिळविण्यासाठी तीळभरही विश्वास ठेवू नये, असेच एकंदरीत अनेकांचं वागणं आहे ते समाजाने वाहवत न जाता समजून घ्यायला हवे.

असो पण आज आ.सुरेश धस यांनी ज्या पध्दतीने मोर्चा काढला तो इतरांना तोंडात बोटं घालायला लावणारा होता. मोर्चाच्या माध्यमातून आ.धसांनी मराठा समाजाला फडणवीसांनी दिलेल्या आरक्षणाचं तोंडभरून कौतूक करताना साडेतीन टक्के समाजावाले फडणवीसांनीच मराठ्यांना आरक्षण दिल हे निःक्षून सांगितलं. आज धसांनी जी गर्दी जमवली ती काही जिल्हाभरातील गर्दी मुळीच नव्हती. आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील त्यांच्या मतदारांची ही गर्दी होती. मोर्चाच्या माध्यमातून आ.धसांनी आजच नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी केली आहे. एकटा वाघ पक्षामध्ये आणि पक्षातील बाहेरच्या लोकांशी लढतोय. स्वाभीमान अंगी ठेऊन जराही मागे हटायचं नाव घेत नाही. मराठा समाजाचेच नव्हे तर सर्वच आठरा पगड जातीधर्माचे प्रश्न घेऊन लोकांमध्ये जातोय, प्रशासनाशी भांडतोय… रात्री बेरात्री मदतीला धावतोय… ऊसाच्या फडात झोपतोय… हातात माईक आणि गळ्यात भोंगा अडकवून कोरोनाची जनजागृती करतोय… गोरगरीब, वंचित शोषीतांसाठी लढणार्‍या स्वाभीमानी नेत्याचं हे बोलकं चित्र यापुर्वी केवळ गोपीनाथ मुंडे यांच्या रुपाने जिल्ह्याने पाहीलं होतं. आता धसांच्या रूपाने जिल्ह्याला तेवढ्याच ताकदीचा संघर्षशील नेता तयार होताना पहायला मिळतोय… स्व.मुंडे यांच्या पश्चात ज्यांना संघर्षाचा वारसा चालवायला दिला त्यांनी अपेक्षाभंग केल्याने लोक पर्याय म्हणून आ.धस यांच्याकडे अपेक्षेने पहात आहेत. धस हेही त्यांच्या अपेक्षांना खरं उतरत असल्याचे दिसत आहे.

Tagged