पंकजाताई मुंडे यांनी मौन सोडले….
मुंबई, दि.9 : प्रीतम मुंडे किंवा मी त्यांच्या मंत्रिपदाची मागणी केली नव्हती. प्रीतम मुंडेंचं नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत मीडियाने चालविले. आम्ही मागणीच केली नव्हती त्यामुळे मंत्रिपद मिळण्याचा प्रश्नच नव्हता, असे स्पष्टीकरण पंकजाताई मुंडे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले. शिवाय डॉ.भागवत कराड यांनी मला आदल्या दिवशी रात्रीच फोन करून मला दिल्लीला बोलावण्यात आल्याचं कळविलं होतं. महाराष्ट्रात कुठेही निवडणुकीचा विषय आला की आमच्या दोघींचं नाव चर्चेत येतं. मी माझ्यावतीने आज सर्वांसमोर सर्व नव्या मंत्र्यांना शुभेच्छा देते, असेहीे भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे म्हणाल्या.
पुढे बोलताना मुंडे म्हणाल्या, संजय राऊत हे त्यांची मतं रोखठोक मांडतात. त्यांचा स्वत:ची मतं आणि अभ्यास आहे. ते मला विचारून त्यांची मतं मांडत नाहीत. त्यांनी जे लिहिलंय ते त्यांचं मत आहे. पंकजा किंवा प्रीतम मुंडे म्हणजे वंजारी समाज नाही. वंजारी समाजातून कोणीही नेता मोठा होत असेल तर त्याला आमचा पाठिंबाच आहे. शिवाय, मंत्रिपद मिळालेले हे मुंडे साहेबांनी घडवलेलेच कार्यकर्ते आहेत. त्यामुळं त्यांचा आम्हाला अभिमानच आहे,’ असं पंकजाताईंनी संजय राऊत यांनी लिहीलेल्या अग्रलेखाबाबत प्रतिक्रीया देताना म्हटले आहे.
गोपीनाथ मुंडे यांचा अनेक राजकीय कार्यकर्त्यांवर प्रभाव आहे. मुंडे कुटुंबावर प्रेम आहे. त्यामुळं समर्थकांमध्ये नाराजीची भावना असेल हे मी नाकारू शकत नाही. मात्र, माझ्या मनात किंवा कुटुंबामध्ये तशी कुठलीही नकारात्मक भावना नाही, असं पंकजा यांनी स्पष्ट केलं.
मुंडे कुटुंबाला राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जातं याबाबत काय वाटतं असं विचारलं असता पंकजा म्हणाल्या, ’असं काही मला वाटत नाही. मुंडे साहेबांचा प्रभाव फक्त मराठवाड्यात आणि महाराष्ट्रातच नाही, देशातील अनेक भागांमध्ये आहे. तो कमी करण्याचा प्रयत्न होतोय असं वाटत नाही आणि तसा तो झाला तर त्यांचा प्रभाव वाढेल, असेही त्या म्हणाल्या.
कोण टिम नरेंद्र कोण देवेंद्र?
मला टीम नरेंद्रमध्ये कोण आहे, टीम देवेंद्रमध्ये कोण आहे, याबाबत माहिती नाही. भाजपला टीम नरेंद्र, टीम देवेंद्र मान्य नाही, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्या मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी म्हटलं की, भाजपमध्ये राष्ट्रप्रथम, द्वितीय पक्ष आणि तृतीय मी असं आमचं तत्व आहे. आमच्या संस्कृतीला मी पणा मान्य नाही. आपण, आम्ही असं म्हणणं आम्हाला मान्य आहे. त्यामुळं अशी कुठली टीम पक्षाला मान्य आहे असं मला वाटत नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. भाजपमध्ये वरिष्ठ चर्चा करुन निर्णय घेतात. भाजपच्या कोणत्याही निर्णयावर आम्हाला आक्षेप नाही. पक्षानं घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. भाजपला मला संपवायचं आहे असं मला वाटत नाही, असंही त्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
पंकजाताईंच्या डोळ्यात अश्रू
मी आणि माझ्या कुटुंबाने पक्षासाठी आयुष्य दिलंय. आम्ही कधी कोणत्या पदाची अपेक्षा केली नाही. पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांनी कधीच मंत्रिपदाची मागणी केली नाही. आम्ही नाराज नाहीत. पायाला फोड आलेले असताना मी परळी मतदारसंघात भाजपचा प्रचार केला. मुंडे साहेब निवडून आले मात्र 17 दिवसाच्या आतच त्यांचा मृत्यू झाला. माझ्या आईला खासदारकीची पेन्शन एकाच टर्मची मिळते. कारण दुसर्या टर्मचा मुंडे साहेबांचा खासदारकीचा शपथविधी झालेला नव्हता, असे सांगताना पंकजाताईंच्या डोळ्यात अश्रू आले होते.
प्रीतमताई मेहनती आहेत
प्रीतमताई मुंडे मेहनती आहेत. नेहमी पक्षासाठी काम करतात. पक्षाच्या सर्व बैठकांना त्या उपस्थित असतात. त्यांना मंत्रिपदाच्या सर्व कॅटेगिरीमध्ये बसतात. त्यांना संधी द्यायला हरकत नाही. पण हे माझं वैयक्तीक मत आहे. पक्षाचे निर्णय सगळ्यांना मान्य करावे लागतात. ते पटो अथवा न पटो. पक्षात असताना काम करण्याची तीच एक पध्दत असते, असेही पंकजाताई म्हणाल्या.