pur

जिल्हाभरात आभाळ फाटलं!

अंबाजोगाई आष्टी केज गेवराई धारूर न्यूज ऑफ द डे परळी पाटोदा बीड मराठवाडा माजलगाव वडवणी शिरूर शेती

बीड दि.28 : मागील चार दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने, त्यात सोमवारी रात्री मुसळधार पावसामुळे जिल्हाभरात आभाळ फाटल्या सारखं दिसत आहे. बीड, गेवराई, अंबाजोगाई, माजलगाव, धारुर, वडवणी, आष्टी, पाटोदा, शिरुर, केज, परळी या तालुक्यात धुवाँधार पावसामुळे शेतकर्‍यांचे आतोनात नुकसान झाले असून अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. पुलावरुन पाणी वाहत असल्यास त्यावरुन जाऊ नये असे अवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

गेवराई : तालुक्यात सोमवारी रात्री पाऊस धो-धो बरसला. सर्वदूर पडलेल्या या पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहे. पंधरा ते वीस वर्षानंतर विद्रुपा नदीला महापूर आला आहे. या महापुराचा सर्वाधिक फटका रेवकी गावाला बसला आहे. गावात पाणी शिरले असून रेवकी देवकीला जोडणारा पुल व गोंदीकडे जाणारा पुल पाण्यात गेल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. गावातील शाळा, अंगणवाडी, तलाठी कार्यालय, मंदिर पाण्यात गेले आहे. तसेच गावातील अनेक घरात पाणीच-पाणी झाले आहे. यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाल्याने ग्रामस्थ हतबल झाले आहेत.

गेवराई तालुक्यात विद्रुपा नदीला पूर आल्याने रेवकीसह अनेक गावामध्ये पाणी शिरल्याने जनजिवन विस्कळीत झाले आहे.

माजलगाव : तालुक्यासह धरण क्षेत्रात मागील 3-4 दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे सकाळपासूनच धरणात पाण्याची मोठी आवक येत असल्याने मंगळवारी 11 दरवाजे दीड ते दोन मीटरने उघडले आहेत. 80 हजार क्यूसेक प्रति सेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे दुसर्‍यांदा सांडस चिंचोलीचा संपर्क तुटला आहे. अनेक गावात पाणी शिरले असून गोविंदपुर, डेपेगाव व लुखेगावात पाणी शिरले आहे. यावर प्रशासन लक्ष ठेवून असल्याचे प्रभारी तहसीलदार अशोक भंडारे यांनी सांगितले आहे. सिंदफणा, गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीला पूर आल्याने अनेक गावामध्ये पाणी शिरले आहे.


आष्टी : मागील दोन दिवसापासून तालुक्यात पावसाने रौद्ररुप धारण केले आहे. या अतिवृष्टीचा शेतकर्‍याना जोरदार फटका बसला असून बळीराजा पुरता कोलमडून गेला आहे. आष्टी तालुक्यातील सर्व महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. दहा महसूल मंडळा पैकी सात मंडळामध्ये तर 100 मिमी.पेक्षा जास्त तर उर्वरीत तीन महसूल मंडळामध्ये 65 मिमी.पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. बुधवार सकाळपासून मागील 24 तासात तालुक्यात सरासरी 111 टक्के मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान 570 मिमी आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस झाला असल्याचे तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी सांगितले. रविवारी झालेल्या अतिवृष्टीने तालुका जलमय झाला असून लहान मोठे सर्व तलाव तुडूंब भरुन वाहत आहेत. मेहकरी तलाव भरल्याने रूई येथील नदीवर पूलावरीन 4-5 फूट पाणी वाहत असल्याने कडा ते मिरजगाव वाहतूक बंद करण्यात आली. पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही प्रवास करू नये असे आवाहन तहसीलदार कदम यांनी केले आहे.

आष्टी तालुक्यातील अनेक फळबागांना तळ्याचे स्वरुप आले आहे.



शिरुर :
गेल्या काही दिवसापासून तालुक्यात पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. यामुळे काढणीला आलेली सोयाबीन, बाजरी पाण्यात गेली. तर कापूस, तूर सह आदी पिकांचे प्रंचड नुकसान झाले आहे. दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे सिंदफणा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी वाढले आहे. त्यामुळे शिरुरमधील बाजारतळावरील पुल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे वाहतूकीस बंद आहे. शेतकर्‍यांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन तहसिलदार श्रीराम बेंडे व नगर पंचायतचे मुख्याधिकारी किशोर सानप यांनी केले आहे.

नेकनूर : गेल्या आठवड्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानंतर शनिवारी रात्री पुन्हा नेकनूरला पावसाने झोडपले. 33 मी. मी.एवढ्या पावसाची नोंद झाली. त्यानंतर पुन्हा रविवार ही रिमझिम पाऊस झाल्यानंतर सोमवारी 49 मी.मी पाऊस झाल्याने सर्व पिके पाण्यात गेली आहेत. नेकनूर येथील शिक्षक कॉलनी, नन्नवरे वस्ती जवळील पाझर तलाव सहा वर्षात पहिलांदाच भरलेला आहे. तसेच नेकनूरला पाणीपुरवठा करणारे भंडारवाडी तांदळवाडी, बाभळगाव ओव्हरफ्लो झाली आहे. मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचे नुकसान झाले असून शासनाकडून ओला दुष्काळ जाहीर होत नाही. सरकार पूर्णच शेत वाहून जाण्याची वाट पाहत आहे की, काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नेकनूर येथील शिक्षक कॉलनी, नन्नवरे वस्ती जवळील पाझर तलाव सहा वर्षात पहिलांदाच भरलेला असून ओसंडून वाहत आहे.



धारुर :
तालुक्यात सोमवारी दुपारपासूनच दमदार पावसाला सुरुवात झाली. रात्री आठ वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत पावसाचा वेग अधिक राहिल्याने सर्व ठिकाणी नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. अनेक ठिकाणी शेतात पाणी शिरल्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर पिके अक्षरशः भुईसपाट झाली आहेत. याचा शेतकर्‍यांना मोठा तडाखा बसला आहे. तालुक्यातील महत्त्वाचा असणारा धारूर-आडस मार्गे अंबाजोगाई हा रस्ता आवरगाव आणि पांगरी याठिकाणी पुलावर पाणी आल्यामुळे बंद आहे. तसेच तांदळवाडी, चिंचपूर, चोरंबा, पाडीपारगाव, पहाडी दहिफळ, ढगेवाडी, अंजनडोह, असोला, हसनाबाद, मोरफळी व्हरकटवाडी, मोहखेड, सूरनरवाडी आदी गावांचा संपर्क तुटलेला आहे.

वडवणी : तालुक्यात मुसळधार पावसाने कापूस, सोयाबीन, मुग आदी पिके अक्षरशः उद्धवस्त झालेली आहेत. शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. मुसळधार पावसामुळे पुले वाहून गेल्यामुळे अनेक गावांचा दोन दिवसांपासून संपर्क तुटलेला आहे. शासनाने तत्काळ उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

जिल्ह्याभरात झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पुलावरुन पाणी वाहत असल्यामुळे व पूल वाहून गेल्यामुळे अनेक मार्ग वाहतूकीसाठी बंद पडले आहेत.

घाटनांदूर : अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूरसह परिसरातील गिरवली, पूस, तळणी, जवळगाव, हातोला, पट्टीवडगाव भागात सोमवारी रात्री 8 वाजेपासून मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस सुरु झाला. रात्री 2 वाजण्याच्या सुमारास वादळीवार्‍यासह मुसळधार पाऊस झाला. सलग बारा तास झालेल्या मुसळधार पावसामुळे रेना नदीला पूर आला. त्यामुळे चोथेवाडी, मुरंबी, चंदनवाडी, बर्दापूर या गावांना जाणारे रस्ते बंद झाले. तर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोयाबीन पीक शेतकर्‍यांच्या पूर्णतः हातातून गेल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. वर्षातून एकदा भरुन वाहणार्‍या रेना नदीला वीस दिवसात पाच वेळा पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठावरील बहूतांश पूल हे कमकुवत झाले आहेत. त्यामुळे ते वाहून जाण्याची मोठी भीती आहे. तसेच अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव हे पूर्णपणे पाण्याखाली आली होते.

पाटोदा :
सोमवारी दिवसभर काहीशी विश्रांती घेतलेल्या वरुणराजाने रात्री 11 च्या नंतर जोरदार हजेरी लावली. तालुक्यातील सर्वच नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत. लहान मोठे तलाव ओव्हरफ्लो झालेत. आगोदर पावसाचा लहरीपणा अन् आता अतिपावसाने तालुक्यात खरीप हंगामातील पिकांची अक्षरशः दैना झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार अतिवृष्टीमुळे तालुक्यातील लागवडीच्या एकूण क्षेत्राच्या 70 टक्के नुकसान झाले आहे. काढणीला आलेले सोयाबीनचे पीक पाण्याखाली गेले असून शेतकर्‍यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.

आडस : परिसरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. शेतातील सर्व पिके पाण्याखाली गेल्याने कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, हायब्रीड ज्वारीचे मोठे नुकसान झाले. आवरगाव, कोळ पिंपरी पुलावर पाणी आल्याने अंबाजोगाई-आडस-धारुर रस्ता सकाळीपर्यंत बंद होता. तसेच अंजनडोह येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने आसरडोह-धारुर रस्ता बंद झाला. त्यामुळे मोरफळीचा संपर्क तुटला. आडस येथील एकता नगरमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच दोन दिवसापासून विज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे अनेक कामे खेळंबली आहेत.

सीईटीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान
आडस : आज सीईटीचा पेपर होता. परंतु रात्रीच्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते बंद असल्याने विद्यार्थ्यांना पेपर देण्यासाठी जाता आले नाही. आडस येथील काही विद्यार्थ्यांचा पुणे येथे नंबर आला होता. पुलावरुन पाणी वाहत असल्यामुळे अनेक रस्ते बंद असल्याने ते रात्री आपल्या घरी परतले. अंबाजोगाई, लातूर, बीड या ठिकाणी परीक्षासाठी जाणारे विद्यार्थी रस्ते बंद असल्याने केज, अंबाजोगाई, धारुरसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी अडकून पडले. त्यांना सीईटीचा पेपर देता न आल्याने नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सीईटीबाबत शासन निर्णय घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

केज-अंबाजोगाईला जोडणार्‍या महामार्गावर केज शहराजवळील पिसाटी नदीवरील पर्यायी पूल वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद आहे. पूल पूर्ववत सुरू करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

Tagged