बीडमधील दोन दिवसांपासून युनियन बँकेचे व्यवहार ठप्प

न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र

तांत्रिक अडचण; ग्राहकांचा संताप

बीड : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील युनियन बँकेच्या शाखेतील व्यवहार गेल्या दोन दिवसांपासून पूर्णपणे ठप्प आहेत. तांत्रिक अडचणीचे कारण दिले जात असून गुरुवारी सायंकाळपर्यंत शाखेतील ही अडचण कायम होती.

शहरातील युनियन बँकेच्या शाखेत हजारो ग्राहक आहेत. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या बँकेत नेहमीच वर्दळ असते. परंंतु तांत्रिक अडचण असल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून या शाखेतील सर्व प्रकारचे व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे ग्राहकांमधून संताप व्यक्त केला जात असून या बँकेविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांसह जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांकडे ग्राहकांनी केली आहे. दरम्यान, ग्राहकांना दोन दिवसांपासून बँकेत चकरा माराव्या लागत आहेत. या शाखेत येणार्‍या ग्राहकांपैकी एका वृद्ध ग्राहकाने शाखा व्यवस्थापकास विचारणा केली असता त्याने मुजोरपणे उत्तरे देत ग्राहकास उद्धट वागणूक दिली, याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर सध्या व्हायरल झाला आहे. संबंधित अधिकार्‍याशी संपर्क न होऊ शकल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही.

आधार कार्ड दुरुस्ती केंद्र बंद
गेल्या दोन दिवसांपासून तांत्रिक अडचणीचे कारण देत शाखा ठप्प आहे. याच बँकेत असलेले आधार कार्ड दुरुस्ती केंद्र देखील बंद आहे. त्यामुळे आधार कार्डधारकांना देखील बँकेत हेलपाटे मारावे लागत आहेत.

बँकेसमोर आंदोलनाचा इशारा
शहरातील युनियन बँकेच्या शाखेचे कामकाज सुरळीत न झाल्यास ग्राहकांना सेाबत घेऊन बँकेसमोर आंदोलन छेडण्यात येईल. याची बँक प्रशासनाने नोंद घ्यावी, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड.नारायण सिरसट यांनी दिला आहे.

Tagged