ऊस उत्पादकांनो गंभीर होऊन विचार करा
कारखाना चालायलाच हवा; पण दलालमुक्त
बालाजी मारगुडे । बीड
दि. 14 : एनएसएल शुगरच्या अधिकार्यांना शेतकर्यांनी चोपून मार दिला की लगेच कारखाना बंद करण्याची भाषा करून ऊस उत्पादक शेतकर्यांमध्ये भितीचं वातावरण तयार केलं जातं. मात्र कारखान्यात वर्षानुवर्षे माजलेले दलाल बाहेर काढायला हवेत असे कारखाना प्रशासनाला कधीच का वाटत नाही? माजलेल्या दलालांमुळेच येथील कारखाना एके दिवशी बंद करण्याची वेळ येणार आहे. त्यातील पहिल्या दलालाचं नाव असणार आहे बालू जाधव….
कारखान्यात साधा कर्मचारी म्हणून लागलेल्या या बालू जाधवकडे शेतकी विभागात अगदी छोटी जबाबदारी आहे. मात्र हा दलाल बालू शेतकर्यांच्या शेतात न जाता एमडी गिरीश लोखंडे यांच्या मांडीला मांडी लावून चोवीस तास केबीनमध्ये बसून असतो. थोडक्यात गिरीश लोखंडे यांचा पाळीव… असल्यासारखा… अर्थात तो शेतात जाणार तरी कसा? कारण त्याला माहिती आहे आपण शेतकर्यांचं काय आणि किती वाटोळं केलं आहे. तो कुणाच्या बांधावर गेलाच तर ऊसाच्या टिपराने शेतकर्यांनी झोडपलाच म्हणून समजा. म्हणून तो सहसा कारखान्याच्या बाहेर पडतच नाही. कर्मचार्यांच्या आड लपून बसतो किंवा वेळ आलीच तर अॅट्रॉसिटीचा दुरुपयोग करण्याची खेळी करतो. या दलाल बालुचे एक ना अनेक कारनामे आता बाहेर पडू लागले आहेत. अनेक शेतकर्यांनी आणि कारखान्यातील काही हितचिंतकांनी त्याचे पुरावेच ‘कार्यारंभ’कडे आणून दिले आहेत. त्यामुळे दलाल बालुच्या पापाचा घडा भरलेला असून तो आता फुटणारच आहे. कारखाना प्रशासनाने वेळीच दलाल बालुचा कारखान्यातील हस्तक्षेप बंद करून त्याला कारखान्यातून बाहेर हाकलून द्यावे. येथील प्रत्येक ऊस उत्पादक शेतकर्यांचा संबंध कुठल्या न कुठल्या मार्गे दलाल बालुशी आलेला आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या हितासाठी ‘कार्यारंभ’ करीत असलेली मागणी किती रास्त आहे हे साधा शेतकरी देखील कारखाना प्रशासनाला ठणकावून सांगेल.
दलाल बालू आता पालकमंत्र्यांचा लाडका…
वैद्यनाथच्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस एनएसएल शुगरला आणला जात आहे. त्यामुळे एनएसएल शुगरमध्ये असलेला हा दलाल बालू पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा देखील लाडका झाला आहे. याचाच गैरफायदा या दलाल बालुने घेत ‘हमको किसका डर नही’ म्हणत कारखान्यात अंदाधुंदी माजवली आहे. हा कारखाना शेतकर्यांसाठी नवसंजिवनी देणारा आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे कारखाना चालू रहायला हवा. मात्र दलालांच्या माजलेल्या टोळ्यांमुळे कारखान्याला फार लवकर घरघर लागू शकते. शेतकर्यांनी देखील दलालांना कसलीही साथ न देता कारखान्याच्या हितासाठी कडक आणि न्यायाची भुमिका घ्यायला हवी. पैसे आहेत म्हणून स्वतःची नोंद वर आणण्याचं पाप कोणीही आपल्या पदरात पाडून घेऊ नये.
नोंदी खालीवर करण्याचं कारस्थान बालुचंच
बालूचे खानदान पेशाने शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यामुळे एखादा महिना लेट ऊस गेला किंवा कारखान्याने टोळी टाकायला उशीर केला तर काय यातना होतात हे दलाल बालुने आपल्या घरच्या मोठ्या व्यक्तींना विचारायला हवं. बालुने गेल्या अनेक वर्षापासून ऊस लागवडीच्या नोंदी खालीवर करून गरीब शेतकर्यांवर अन्याय केला आहे. त्यामुळे त्याच्या पापाचा घडा आता भरलेलाच आहे.
लोखंडे साहेब असली खद्रावळ बाहेर फेका
लोखंडे साहेब तुमच्याकडे कारखान्याची खूप मोठी जबाबदारी आहे. कारखाना चालू किंवा बंद झाला तर ती तुमचीच जबाबदारी असणार आहे. दलालांमुळे कारखाना बंद करण्याची वेळ येऊ नये. अन्यथा लाखो ऊस उत्पादक शेतकर्यांची हाय तुम्हाला आणि दलालांना लागेल. कारखाना चालू राहीला तर आशीर्वाद मिळतील. हाय लागून घ्यायची की आशीर्वाद मिळवायचे हे सर्वस्वी तुमच्याच हातात आहे. त्यामुळे दलाल बालुसारखी खद्रावळ तुम्ही कारखान्याच्या बाहेर फेका अशी लाखो शेतकर्यांच्या वतीने आपणास विनंती आहे.