SUSHIL KHODAVEKAR

टीईटी घोटाळ्या प्रकरणी आयएएस सुशील खोडवेकर पोलीसांच्या ताब्यात

क्राईम न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

बीड, दि.29 : पुणे सायबर पोलीसांनी टीईटी घोटाळ्या प्रकरणी आज आणखी एका महत्वाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. कृषी विभागात प्रोजेक्ट डायरेक्टर (प्रकल्प संचालक, महाराष्ट्र कृषी स्पर्धात्मकता प्रकल्प, पुणे) म्हणून कार्यरत असलेले 2011 बॅचचे आयएएस सुशील खोडवेकर यांना आज मुुंबई येथून उचलण्यात आले आहे. यापुर्वी अटकेत असलेला आरोपी परिक्षा परिषदेचा माजी अध्यक्ष तुकाराम सुपे याच्याशी खोडवेकर याचे घनिष्ठ संबंध आढळून आले आहेत.

टीईटी परीक्षा 2019-20 खोट्या वेबसाईटवर निकाल प्रसिद्ध करून 550 ते 600 अपात्र उमेदवारांना पात्र केल्याचा आरोप सुरुवातीला होता. मात्र पुणे सायबर पोलीसांनी केलेल्या तपासात तब्बल 7800 जणांना पैसे घेऊन पास केल्याचे तपासात उघड झाले. आतापर्यंत या गुन्ह्यात तुकाराम सुपे, जीए सॉफ्टवेअर कंपनीचा मालक अश्विनकुमार, प्रीतिश देशमुख, अभिषेक सावरीकर, संतोष हरकळ, अंकुश हरकळ, सुनील खंडू घोलप, लातुर येथील मनोज डोंगरे, सुरंजित गुलाब पाटील नाशिक, आणि स्वप्नील तीरसिंग पाटील चाळीसगाव यांना अटक झालेली होती. तर 2018 टीईटी परिक्षा प्रकरणी सुखदेव डेरे, तुकाराम सुपे, जीए सॉफ्टवेअर कंपनीचा मालक अश्विनकुमार, प्रीतिश देशमुख, अभिषेक सावरीकर, सौरभ त्रिपाठी, संतोष हरकळ, अंकुश हरकळ यांना अटक झालेली होती. या आरोपींवर भादंवी कलम 406, 409, 420, 465, 467,468, 34 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (ड), महाराष्ट्र विद्यापीठ मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणार्या गैर प्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम (1990 सुधारित) कलम 7, 8 प्रमाणे गुन्हा नोंद आहे.

आज पोलीसांनी ताब्यात घेतलेला आरोपी सुशील खोडवेकर यांचा रोल खासकरून तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर याच्यावरील आरोपाशी संबंधीत होता. खोडवेकर याच्या माध्यमातून सुपे याच्यापर्यंत अनेकांना पैसे पोहोच झालेले होते.

तपासाला गती
मधल्या काळात पुणे सायबर विभागाच्या अनेक अधिकार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याने तपास थांबलेला होता. परंतु आज एका बड्या अधिकार्‍याला अटक झाल्यानंतर पुणे सायबर पोलीस पुन्हा एकदा कामाला लागल्याचे दिसत आहे. सुशील खोडवेकर याची अटक म्हणजे महाराष्ट्रातील अनेक अधिकार्‍याना धक्का आहे. आणखी अनेक अटक या प्रकरणात होणार असल्याचे पुणे सायबर विभागातील सुत्रांनी सांगितले.

सुशील खोडवेकर परळी तालुक्याचा रहीवाशी
आयएएस सुशील खोडवेकर हा मुळ परळी तालुक्यातील खोडवा सावरगाव येथील रहीवाशी असल्याचे माहिती आहे. यापुर्वी 2017 मध्ये त्याने परभणी जिल्हा परिषद सीईओ म्हणुनही काम पाहीलेले आहे. त्याला पोलीसांनी ताब्याात घेतल्याने बीड जिल्ह्यातील आतपर्यंत उजेडात न आलेेेेल्या अनेक दलालांना आणि काही अधिकार्‍यांना देखील लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.

Tagged