– कर्मचारी म्हणतात रेकॉर्ड चोरी गेले; मात्र पोलीसात तक्रार गहाळ झाल्याची
– सब गोलमाल है!
– कार्यालयाचा कडी-कोयंडा तोडून दरोडा पडलाय अन् एमडी लोखंडे कागदपत्रं गहाळ झाल्याची तक्रार कशी काय देतात?
माजलगाव, दि.5 : माजलगाव तालुक्यातील पवारवाडी शिवारात असणार्या जयमहेश शुगर कारखान्याने शेतकर्यांच्या उसाच्या घेतलेल्या नोंदीचे रेकॉर्ड मोगरा शिवारातील पोहनेर रोडवरील उसाच्या फडात सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. आगोदरच कारखान्यावर सातत्याने नोंदी उडवल्याचा आरोप आहे. त्यात ऊस तोडणीच्या नोंदीची कागदपत्र फडात सापडल्याने शेतकर्यांच्या या आरोपांवर शिक्कामोर्तब होत आहे.
माजलगाव तालुक्यातील साखर कारखाने कार्यक्षेत्रातील उसाला प्राधान्य देण्याऐवजी गेटकेनचा ऊस आणण्यावर जास्त भर देत आहेत. त्यामुळे नोंदी आसलेल्या शेतकर्यांच्या उसाला तोडणी अभावी तुरा येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. या शेतकर्यांसाठी राजकीय पक्ष, शेतकरी संघटना कारखान्याला जाब विचारुन गेटकेन ऊस बंद करण्याची मागणी करत असताना दि. 5 फेब्रुवारी रोजी पोहनेर रोडवरील मोगरा ते खंडोबा फाट्यावर एका शेतकर्याच्या शेतात ऊस तोडणी सुरु आसताना, मजुरांना ऊस तोडीच्या नोंदीची कागदपत्रे आढळून आली. ही बाब डॉ. संजय नाकलगावकर यांनी कारखाना प्रशासन, पोलीस प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आणून दिली. कारखान्याच्या ऊस तोडीचे हे मोठ्या प्रमाणातील रेकॉर्ड या ठिकाणी कसे आले असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लोखंडे म्हणतात कोणीतरी खोडसाळपणा केला
याबाबत कारखान्याचे एमडी गिरीश लोखंडे कार्यारंभशी बोलताना म्हणाले, कागदपत्रांची चोरी झाली आहे. कोणीतरी खोडसाळपणा केला असून त्या बाबतची तक्रार माजलगाव ग्रामीण ठाण्यात दिल्याचे सांगितले.
कडी कोयंडा तोडला तरी गुन्हा नोंद नाही
कारखाना प्रशासनाकडून बोलताना कागदपत्रांची चोरी झाली असे सांगितल जाते. मात्र तक्रार देताना त्यांनी ‘गहाळ’ हा शब्द प्रयोग केला आहे. कागदपत्रं गहाळ असल्याने पोलीसांनी नियमाप्रमाणे केवळ नोंद घेतली. त्यात गुन्हा दाखल करण्याचा पोलीसांचा रोल येत नाही. मात्र प्रत्यक्षात हे रेकॉर्ड ज्यांच्या ताब्यात होते ते एनएसएल शुगरचे कर्मचारी तथा तक्रारदार सहदेव शिवराम डाके ‘कार्यारंभ’शी बोलताना म्हणाले की ‘या ठिकाणच्या कार्यालयातील कडी कोयंडा तोडण्यात आला आहे. लोखंडी कपाटाचे वेल्डींग केलेले कोंडेही तोडण्यात आले आहेत’. प्रत्यक्ष परिस्थितीही तशीच आहे. शिवाय सापडलेली कागदपत्रं दिवसा ढवळ्या कोणी एक माणूस डोक्यावर किंवा दुचाकीवर घेऊन जावू शकत नाकी. त्यासाठी दोन ते चार जण असावेत. शिवाय गुन्ह्यात चारचाकी गाडी वापरलेली असावी. ही सर्व प्रत्यक्ष परिस्थिती आणि कर्मचार्याचा जवाब पाहता कारखाना प्रशासनाने तक्रार देताना दरोड्याची तक्रार द्यायला हवी होती, मात्र तसे काहीही झालेले नाही. मात्र कारखाना प्रशासन कोणाला तरी वाचवण्यासाठी जाणून बुजून पोलीसांपासून काहीतरी लपवत आमची कागदपत्रं ‘गहाळ’ झाली असा शब्दप्रयोग करीत आहे. कदाचित चोर कोण हे सर्वांनाच माहिती असावेत, अशी कुजबूज या परिसरात आहे.
खोडसाळपणा कोणाचा अधिकार्यांचा, कर्मचार्यांचा की दलालांचा?
खोडसाळपणा कोणाचा अधिकार्यांचा, कर्मचार्यांचा की दलालांचा?
एमडी गिरीश लोखंडे यांच्या म्हणण्यानुसार कागदपत्रं गहाळ करण्याचा खोडसाळपणा झाला आहे. कडी कोयंडा तोडून खोडसाळपणा होतो की दरोडा? यात कारखान्यातील वरीष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांचा तर सहभाग नाही ना? की दलालांनी या ऑफिसवर दरोडा टाकला याचा शोध घेणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी पोलीसांनी आधी गुन्हा नोंद करायला हवा. परिसरातील शेतकर्यांनीही त्यांच्याकडील माहिती पोलीसांना अथवा दैनिक कार्यारंभला पुरवावी, असे आवाहन आम्ही करत आहोत.
रेकॉर्ड दोन तारखेलाच गेले की आधीच?
दरम्यान हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद आहे. ऊस तोडीच्या नोंदी गायब करून ऐनवेळी प्रति एकरी 10 हजार रुपये शेतकर्यांकडून घ्यायचे आणि त्यांना कारखान्यातून कोड काढून द्यायचा हा प्रकार कारखान्यात सर्रास चालतो. त्यामुळे हे रेकॉर्ड 2 फेब्रुवारीलाच गायब केले की त्याहीपुर्वी? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. रेकॉर्ड सापडल्यानंतर कारखान्याने तातडीने जाऊन पोलीसात मागच्या तारखेत तक्रार अर्ज नोंद करून घेतला नाही ना? अशी देखील शंका आहे. हा चोरी प्रकार साधासुधा नसून शेतकर्यांच्या कोट्यावधी रुपये किंमतीच्या ऊसावर दरोडा टाकणारा आहे. त्यामुळे या प्रकरणात माजलगाव ग्रामीण पोलीसांनी दरोड्याचा गुन्हा नोंद करून तपास तातडीने सुरु करायला हवा.