बीडमध्ये उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध शिवसेनेने केले निषेध आंदोलन!

न्यूज ऑफ द डे बीड

माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, विपुल पिंगळे यांच्यासह शिवसैनिकांना अटक

बीड : मतदारसंघातील १०० कोटींच्या विकासकामांच्या उदघाटनास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑनलाइन हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विशेष मंजुरी दिलेल्या कामांचेही श्रेय राष्ट्रवादीचे आमदार घेत असल्याचा आरोप करत शिवसेना आक्रमक झाल्याचे दिसून आले. शहरातील मुख्य मार्गावर आज (दि.८) शिवसैनिक उतरले होते. यावेळी काळे झेंडे दाखवत उपमुख्यमंत्र्यांविरोधात निषेध आंदोलन केले. त्यामुळे शिवाजीनगर पोलिसांनी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, युवासेना राज्य विस्तारक विपुल पिंगळे यांच्यासह १० ते १५ शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमाला शिवसेनेने विरोध केला. बीडमधील उद्घाटन कार्यक्रमावरून सत्तेत असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आमने-सामने आल्याचे दिसून येत आहे. कार्यक्रम सुरू होण्याच्या आधीच शिवसैनिक काळे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरले. शिवसैनिकांनी याठिकाणी घोषणाबाजी सुद्धा केली. शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून काही विकासकामे मंजूर करून आणले होते, त्याचे उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते, आमदार संदीप क्षीरसागर हे करत आहेत. संदीप क्षीरसागर यांना राष्ट्रवादीने समज द्यावी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आघाडी धर्म शिकवावा अशी मागणी शिवसेनेने आठवडाभरापासून लावून धरली होती आणि आज कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी निषेध आंदोलन देखील केले. यावेळी शिवाजीनगर पोलिसांनी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्यासह युवासेना राज्य विस्तारक विपुल पिंगळे, युवासेना जिल्हाप्रमुख शुभम डाके, सागर बहिर, अभिषेक दिवे, ओमकार पवार, प्रदीप बेडे, सखाराम सगळे, अशोक बेडे यांच्यासह १५ ते २० जणांना ताब्यात घेतले आहे.

Tagged