पोलिसांनी नोटीस बजावली, तरीही उपमुख्यमंत्र्यांविरूद्ध निषेध आंदोलन

न्यूज ऑफ द डे बीड

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांचा इशारा

बीड : मतदारसंघात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष मंजुरी दिलेल्या शिवसेना पदाधिकार्‍यांच्या कामांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आठकाडी घालत असल्याचा आरोप करत शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन मुळूक यांनी उपमुख्यमंत्र्यांविरोधातील निषेधाचे आंदोलन पोलिसांनी नोटीस बजावली असली तरी आपण करणारच, असा इशारा दिला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बीड जिल्ह्यात 100 कोटींच्या विकास कामांच्या उद्घाटनासाठी दौर्‍यावर आहेत. त्यांच्या पक्षाचे स्थानिक आमदार हे महाविकास आघाडीचा धर्म पाळत नसून नेहमीच शिवसेना पदाधिकार्‍यांच्या कामांची अडवणूक करत आहेत. त्यामुळे त्यांना आघाडी धर्म शिकवा. कामे होत असतील तर आनंदच आहे मात्र सर्वच कामे राष्ट्रवादीची नाहीत. यात अनेक कामे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष बाब म्हणून मंजुरी दिलेल्या आहेत. अशा कामांचेही श्रेय आमदार घेत आहेत, त्याचा आम्ही निषेध करतो. पोलीस प्रशासनाने नोटीस पाठवली आहे, तरी देखील आंदोलन होणारच, शिवसेनेचा गनिमी कावा दाखवू, असा इशारा शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन मुळूक यांनी दिला आहे.

Tagged