स्वा.सावरकर उद्यान लोकार्पणाच्या प्रतीक्षेत; ५ वर्षे उलटूनही काम रखडलेलेच

न्यूज ऑफ द डे परळी

परळीत पुण्यतिथीदिनी सावरकर प्रेमींवर इतरत्र अभिवादनाचा कार्यक्रम घेण्याची वेळ

परळी
दि.२६ : भारतमातेच्या स्वातंत्र्य लढ्यात अमूल्य योगदान देणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांची अवहेलना परळी नगरपरिषदेकडून होतांना दिसत आहे. शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळा रोड वरील पद्मावती मंदिराच्या मागे असलेल्या स्वा.सावरकर उद्यानाचे काम ५ वर्षांनंतरही लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. शहरात स्वा. सावरकर उद्यान असूनही त्यांच्या पुण्यतिथी दिनी अभिवादनाचा कार्यक्रम इतर ठिकाणी घेण्याची वेळ सावरकर प्रेमींवर आली आहे.

आज सावरकर प्रेमींनी आयोजित केलेला अभिवादनाचा कार्यक्रम इतर ठिकाणी आयोजित केला आहे. शहरात नगर परिषद सत्ताधाऱ्यानी २०१६ सालच्या निवडणूकीच्या तोंडावर पद्मावती मंदिराच्या मागे उद्यानाचे बांधकाम करून प्रातिनिधिक स्वरूपात त्याचे उदघाटन केले. तब्बल ५ वर्षे उलटूनही सावरकर उद्यानात सावरकरांचा पुतळा तर सोडाच उद्यानाच्या नावाचा साधा बोर्डही नगर परिषदेने लावलेला नाही. तसेच, उद्यानात विजेची आणि पाण्याचीही सोय केलेली दिसत नाही. एकावर्षी तर सावरकर पुण्यतिथीच्या दिवशी बागेत वाढलेले झाडेझुडपे सावरकर प्रेमींनी काढून टाकून मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात कार्यक्रम घेतला. आजतागायत या उद्यानाचे हालच झालेले दिसून येत आहेत. यावरून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या महापुरुषांचा वापरही फक्त राजकारणासाठी केला जातो का? असे प्रशचिन्ह निर्माण झाले आहे. या उद्यानात सर्व सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात व हे उद्यान सर्वांसाठी खुले अशी मागणी सावरकर प्रेमींकडून केली जात आहे.

Tagged