court

विवाहितेची आत्महत्या; पतीला ७ वर्षे सक्तमजुरी

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे

अंबाजोगाई सत्र न्यायालयाचा निकाल

अंबाजोगाई : तालुक्यातील साकुड येथील विवाहितेचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना दि.२८ जून २०१८ रोजी घडली होती. याप्रकरणी अंबाजोगाई सत्र न्यायालयाने पतीला ७ वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा शुक्रवारी सुनावणी आहे.

रहिमखा ईस्माइल पठाण असे आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यात शेख बशीर शेख शेरजंग (रा. मुलतानी तांडा, साकुड, ता, अंबाजोगाई) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची मयत मुलगी भुशेराबी यांचा विवाह सन-२०१४ मध्ये आरोपी रहिमखा ईस्माइल पठाण याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर बुशराबी नांदण्यासाठी गेली असता तिचा पती व सासु-सासरे हे बुशेराबीला ऊस तोडणीच्या कामासाठी कारखान्याला घेवून गेले होते. स्वयंपाक चांगला येत नाही, काम करता येत नाही अशा कारणावरून नवरा, सासु-सासरे हे शिवीगाळ व मारहाण करत होते. ऊस तोडणीवरून गावी आल्यानंतर सन २०१६ मध्ये तिचा नवरा रहिमखा तिला मारहाण करून पुणे येथे निघून गेला. त्यानंतर २ वर्षांनी परत आल्यानंतर फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी मध्यस्थी करून मुलगी बुशेराबी हिला नांदविण्यास पाठविले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपी बुशेराबीला लातूर येथे घेवून गेला आणि तिला लातुरहून वाघाळा कारखाना येथे तिला एकटीच सोडून गेला. त्यानंतर बुशेराबी एकटीच साकुड येथे आली. दि.२८ जून २०१८ रोजी सकाळी ९ वाजता मयत बुशेराबी हिने त्रासास कंटाळून राहत्या घरी पत्राच्या आडुला गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी दुसऱ्या दिवशी अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास करून पोलीस अधिकारी एस. डी. भिकाणे यांनी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. हे प्रकरण अतिरिक्त दुसरे सत्र न्यायाधीश व्ही. के. मांडे यांच्या न्यायालयात चालले. सरकार पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. त्यांची साक्ष ग्राह्य धरून तसेच सरकारी वकील यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश व्ही.के. मांडे यांनी आरोपीला सात वर्षे सक्तमजूरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली सरकार पक्षातर्फे अॅड. शिवाजी व्ही. मुंडे यांनी काम पाहीले व त्यांना अॅड. एल. बी. फड यांनी सहकार्य केले. तसेच पोलीस पैरवी गोविंद कदम य पो.ना.शितल घुगे यांनी सहकार्य केले.

Tagged