रेणू शर्माला आणखी दोन दिवस पोलीस कोठडी

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

ब्लॅकमेलिंग, खंडणी मागणी प्रकरण

मुंबई  : हनी ट्रॅप त्यातून अनेकांना ब्लॅकमेलिंग आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेल्या कथित रेणू शर्मा या महिलेच्या पोलीस कोठडीत मुंबई न्यायायलाने आज आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

धनंजय मुंडे यांना 5 कोटी रुपये नगदी व 5 कोटी रुपयांचे दुकान घेऊन द्या नाहीतर केस करून व सोशल मीडियावरून बदनामी करेन, असे धमकावून खंडणी मागितल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांनी मुंबई पोलिसात तक्रार दिली होती. मुंबई क्राईम ब्रँच ने रेणू शर्मा हिला दि. 21 रोजी मुंबई न्यायालयासमोर हजर केले होते. मुंबई न्यायालयाने रेणू शर्माला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती, आज सदर महिलेस दोन दिवसांची मुदत संपल्याने पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने पोलीस कोठडीत आणखी 2 दिवसांची वाढ केली आहे. रेणू शर्मा हिच्या वकिलांनी रेणू ही करुणा शर्मा यांची बहीण असून, करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पत्नी नाहीत तर केवळ त्यांचे लिव्ह – इन संबंध होते, असे आपल्या युक्तिवादात रेकॉर्डवर नमूद केले आहे. रेणू विरोधात इतरही अनेकांच्या खंडणी मागीतल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे रेणू हिची व्यवस्थित चौकशी होणे, तिचे बँक खाते व अन्य मालमत्ता तपासणे गरजेचे असणे कोर्टाने नमूद केले. धनंजय मुंडे यांनी दिलेल्या तक्रारी सोबत दाखल केलेले पुरावे प्राथमिक दृष्ट्या खरे असल्याचे दिसत असून, रेणू शर्माने पैश्यांची उधळपट्टी, महागडे मोबाईल्स व अन्य मौल्यवान वस्तू घेतल्याचेही पुरावे सापडले असल्याचे कोर्टाने नमूद केले, या प्रकरणी अधिक तपास व चौकशी व्हावी या दृष्टीने रेणूच्या पोलीस कोठडीत 25 एप्रिल पर्यन्त वाढ करण्यात आली असून, रेणूच्या मालमत्ता व बँक खाते आदी तपासातून आणखी काय समोर येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

असे आहे प्रकरण
रेणू शर्मा ही करुणा शर्मा यांची बहीण असून, स्वतः गायक असल्याचे भासवून विविध क्षेत्रातील अनेकांना हनी ट्रॅप मध्ये अडकवण्याचा तिने यापूर्वी प्रयत्न केलेला आहे, त्याबाबतच्या तक्रारी याअगोदर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. मागील वर्षी याच महिलेने आपल्यावर बलात्कार झाला असल्याचे एक पत्र पोलिसात देत, ते पत्र सोशल मीडियावर व्हायरल करून खळबळ उडवून दिली होती. काही दिवसातच तिने ती तक्रार विनाअट माघारी घेतली होती. तेव्हापासून ‘एक कागद मजाक मध्ये व्हायरल केला तर तुमचे मंत्री पद जायची वेळ आली होती, तेव्हा आपले मंत्रीपद वाचवण्यासाठी दहा कोटी फार मोठी रक्कम नाही, दहा कोटी द्या नाहीतर बदनाम करून टाकेन’ अशा आशयाचे मेसेज व आंतरराष्ट्रीय नंबर वापरून फोनवरून धमक्या देण्याचे सत्र सदर रेणू शर्मा हिने सुरू केले होते. या धमकी सत्राला वैतागून धनंजय मुंडे यांनी मुंबई पोलिसात धाव घेत, सदर महिले विरुद्ध पुराव्यासहित तक्रार दिली होती, त्यानंतर तिला मध्य प्रदेशातील इंदौर येथून मुंबई पोलिसांनी अटक करून मुंबई न्यायालयात हजर केले होते. दरम्यान रेणू शर्माचा सोमवार पर्यंत तरी मुक्काम पोलीस कोठडीत असणार आहे.

Tagged