पतीने केला पत्नीचा खून; रचला दरोड्याचा बनाव!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


बीड दि. 5 : महिलेचा स्क्रूड्रायवरच्या सहायाने गळा दाबून हत्या केल्याची घटना बीड तालुक्यातील रंजेगाव येथे रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. दरोडेखोरांनी हा प्रकार केल्याचे बनाव मयत महिलेच्या पतीने रचला होता. मात्र सगळा प्रकार संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच महिलेच्या पतीने आपणच हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली.


ज्योती दिनेश आबुज (वय 31 रा. रंजेगाव ता.बीड) असे मयत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पहाटेच्या सुमारास आबुज यांच्या घरात दरोडेखरांनी प्रवेश केला. त्यांच्यासह लहान मुलांना बांधून ठेवले, व आरडाओरड करू नये म्हणून तोंडात बोळा कोंबला. त्यानंतर पत्नीवर अत्याचार करत तिचा खून केला व घरातील रक्कम घेऊन पसार झाले. अशी माहिती मयत महिलेच्या पती दिनेश पांडुरंग आबुज (वय 36) पोलिसांना दिली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. त्यानंतर तपासाची चक्रे गतिमान करत अवघ्या काही तासात या प्रकरणाचा उलगडा केला. आरोपीने पत्नीची हत्या का केली? याचा तपास पोलीस करत आहेत.

आरोपी दिनेश
मयत ज्योती

घटनास्थळी भेट दिल्यानंतर मयत महिलेच्या पतीने घटनाक्रम सांगितला. पण संशयास्पद वाटल्याने पतीची उलट तपासणी केली, त्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अधिक तपास करत आहोत.
संतोष वाळके
उपविभागीय पोलीस अधिकारी, बीड

घटनास्थळी वरिष्ठांची भेट
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, पिंपळनेर पोलीसांनी धाव घेतली. तसेच श्वान पथक, ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते.

नातेवाईकांचा आक्रोश
या घटनेने पूर्ण गाव सुन्न झाले होते. घटनास्थळी नातेवाकांसह गावातील नागरिकांनी मोठी गर्दी करत आक्रोश केला.
मयत महिलेचे सासू सासरे हे चारधाम यात्रेला गेलेले होते.

Tagged