अवैध गर्भपात प्रकरणात पाच जणांवर गुन्हा दाखल!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


तपासात आरोपींची संख्या वाढणार
बीड दि.8 ः गर्भपातादरम्यान रक्तस्त्राव होऊन महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.5) घडली होती. त्यानंतर मयत महिलेच्या पतीसह नातेवाईकांना चौकशीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावले. त्यांनी कबुली देताच त्यांना ताब्यात घेतले, तसेच गेवराई तालुक्यातील अंगणवाडी सेविकेसह सिस्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणी बुधवारी (दि.8) पहाटेच्या सुमारास पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गर्भपात प्रकरणामध्ये आणखी आरोपींची संख्या वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सीताबाई उर्फ शीतल गणेश गाडे (वय 30, रा. बक्करवाडी, ता.बीड) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांना अगोदरच 9, 6, आणि 3 वर्षांच्या तीन मुली आहेत. त्या चौथ्यांदा गर्भवती होत्या. परंतु, रविवारी अचानक त्यांना रक्तस्त्राव सुरू झाल्याने पहिल्यांदा खासगी आणि तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. यात संशय आल्याने पाच तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीकडून शवविच्छेदन करण्यात आले होते. यात हा अवैध गर्भपात असल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी (दि.7) सकाळीच मयताच्या नातेवाइकांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेत चौकशी केली. त्यांनी याची कबुली दिली. त्यानंतर त्या सर्वांना घेऊन पोलीसांनी ज्यांनी गर्भपात केला, अशा ठिकाणी पोहचले. गेवराई तालुक्यातील रानमाळा येथील अंगणवाडी सेविकेसह सिस्टरला पोलिसांनी दुपारी ताब्यात घेतले. बुधवारी (दि.8) पहाटेच्या सुमारास पिंपळनेर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक ढाकणे यांच्या फिर्यादीवरुन मयत महिलेचा पती गणेश गाडे, सासरा सुंदरराव गाडे, भाऊ नारायण निंबाळकर, मध्यस्थ महिला अंगणवाडी सेविका मनिषा सानप, सिमा सिस्टर यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांसह पीसीपीएनडीटी आणि एमटीपी कायद्यातील विविध कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागयी पोलीस अधिकारी संतोष वाळके हे करत आहेत.

Tagged