बीड, दि.31 : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांना बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करणार्या मालेगावच्या माजी नगरसेवकाला औरंगाबादच्या उस्मानपुरा पोलिसांनी 29 जुलैला रात्री मालेगाव येथून ताब्यात घेतले. तो महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देत होता.
नदीमोद्दीन अलीउद्दीन शेख (रा. मालेगाव) असे या माजी नगरसेवकाचे नाव आहे. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. त्याचा व्हिडिओ बनवून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मी सांगेन तसे कर. आपण खूप पैसे कमवू, असे म्हणत धमकावले होते. सुरुवातीला त्याने तरुणीला नाशिकला नेले. तिथे खोटी तक्रार दाखल करायला सांगितले.
तरुणीने तक्रारही दिली. मात्र तिथल्या पोलिसांना संशय आल्याने त्यांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर नदीमोद्दीनच्या सांगण्यानुसार तिने औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात मेहबूब शेखविरुद्ध बलात्काराची तक्रार दिली. त्यावरून बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. सहायक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ प्रकरणाचा तपास करत असताना फिर्यादच खोटी दिल्याची कबुली 18 जूनला पीडितेने जिन्सी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले होते.
त्यावरून नदीमोद्दीन व विशाल खिल्लारे (रा. मुकुंदवाडी) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. तक्रारीत पीडितेने भाजपाच्या चित्रा वाघ व आमदार सुरेश धस यांचीही नावे घेतली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस निरिक्षक गीता बागवडे करत आहेत. नदीमोद्दीनला बलात्काराच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळाला, मात्र खोटी तक्रार केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.