चप्पल घेतली नाही म्हणून दहा वर्षीय चिमुकल्याची आत्महत्या!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड माजलगाव

बीड दि.13 : आई-वडील ऊसतोड मजूर असल्याने कारखान्याला गेलेले. त्यांचा दहा वर्षीय मुलगा शिक्षणासाठी आज्जीकडे ठेवलेला. त्याने आज्जीकडे चप्पलची मागणी केली. गरीब परिस्थिती असल्याने आज्जीने सहज नकार दिला, याचाच राग आल्याने दहा वर्षीय मुलाने साडीच्या सहाय्याने रस्त्यावरील एका छोट्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना सोमवारी (दि.13) दुपारी दिंद्रूड ठाणेहद्दीतील बोडखा कासारी येथे घडली.

युवराज श्रीमंत मोरे (वय 10, रा.बोडखा, कासारी) असे मयत मुलाचे नाव आहे. आई-वडील ऊसतोडणीसाठी कारखान्यावर गेल्यामुळे युवराज हा हिंगणी (खु.) येथे विश्वनाथ काशिनाथ उजगरे यांच्याकडे आजोळी होता. त्याने आजीकडे नवीन चप्पलची मागणी केली होती. मात्र आजीने सहजच त्यास नकार दिला, या किरकोळ गोष्टीचा युवराजला राग आला आणि त्याने मी आता आई-वडिलांकडेच जातो म्हणून तो रस्त्याने निघाला. रस्त्यावर असलेल्या एका झाडाला त्याने साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच दिंद्रूड पोलीस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक गणेश राठोड यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह धारुर ग्रामीण रुग्णालयात दाखल केला, शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेने गावावर शोककळा पसरली असून लहान मुलाच्या आत्महत्येने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tagged