शेजूळ हल्ला प्रकरणात मोठी घडामोड
प्रतिनिधी । अंबाजोगाई
दि.27 : माजलगाव भाजपा कार्यकर्ते अशोक शेजूळ यांच्यावर धुलीवंदनाच्या दिवशी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ला प्रकरणात आ. प्रकाश सोळंके यांचे स्वीय सहायक महादू सोळंके यांचा हल्ल्याशी संबंध आढळून आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी केली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज आमदार प्रकाश सोळंके यांचे स्वीय सहायक महादू सोळंके यांना केज येथे चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. दोन ते तीन तास त्यांची कसून चौकशी करण्यात आली. शेजूळ यांच्या हल्ला प्रकरणात त्यांचा सहभाग आढळून आल्याने त्यांना आज चौकशीदरम्यान अटक करण्यात आली असून त्यांना माजलगाव शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अनेकांचे धाबे दणाणले
दरम्यान या हल्ल्याशी संबंधीत अनेकांचे धाबे दणाणले असून यापुर्वीच आ.प्रकाश सोळंके, त्यांच्या पत्नी मंगल सोळंके आणि रामदयाल टवाणी यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. तर प्रत्यक्ष हल्ला करणारे अविनाश बाबासाहेब गायकवाड (वय 26 रा.पुनंदगाव), संदीप बबन शेळके (वय 22) सुभाष बबन करे (वय 26), शरद भगवान कांबळे (वय 29, सर्वजण रा. पुरूषोत्तमपुरी), विजय शिवाजी पवार यांना अटक करण्यात आलेली आहे. आज झालेल्या अटकेनंतर आता प्रकरणात मोठी घडामोड घडणार आहे.