modi

पंतप्रधान मोदी आज साधणार सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद

देश विदेश महाराष्ट्र

दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन चा पर्याय सगळ्या देशाने स्वीकारला. आता हळूहळू सगळं पूर्ववत आपण करत असलो, तरी कोरोनाग्रस्तांची संख्या रोज नवे टप्पे गाठत आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. बरे होणारे रुग्ण जरी अधिक असले, तरी प्रादुर्भाव कमी आहे असं नाहीये. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत.

अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी लॉकडाउन हळूहळू शिथील केला जात असून, अनलॉक 1 जाहीर करून दोन आठवडे लोटले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी व पुढील योजना ठरवण्यासंदर्भात राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आहे. दोन टप्प्यात ही बैठक असून, पहिल्या दिवशी 21 राज्य व केंद्र शासित प्रदेशातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यानंतर आज महाराष्ट्रासह उर्वरित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी मोदी चर्चा करणार आहेत.

करोनाचा उद्रेक झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वेळा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन संवाद साधला होता. आज होणाऱ्या बैठकीत महाराष्ट्रासह तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, बिहार, आंध्र प्रदेश, हरयाणा, जम्मू-काश्मीर, तेलंगणा, ओडिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.

कालच्या बैठकीत काय म्हणाले होते पंतप्रधान?
“आपल्या एका गोष्टींची काळजी घ्यायची आहे की, करोनाला जितकं रोखता येईल, त्याचा प्रसार जितका रोखता येईल, तितकीच आपली अर्थव्यवस्था खुली होत जाईल. कार्यालय उघडतील. बाजारपेठा खुल्या होतील. वाहतुकीची साधन सुरू होतील आणि तितक्याच रोजगाराच्या नव्या संधी आपल्यासाठी निर्माण होतील. शेतकऱ्यांच्या उत्पादनाचं मार्केटिंग करण्यासाठी सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकण्यासाठी नवे पर्याय खुले होतील. त्यांचं उत्पन्न वाढेल व साठवण करण्याच्या सुविधा नसल्यानं शेतकऱ्यांचं जे नुकसान होत होतं, तेही आपण कमी करू शकू” असं आवाहन त्यांनी कालच्या बैठकीदरम्यान केलं होतं.

Tagged