kidnapping bride

अल्पवयीन नववधूचं अपहरण!

क्राईम न्यूज ऑफ द डे वडवणी

अल्पवयीन नववधूचं अपहरण!
वडवणी : पंधरा दिवसापुर्वी लग्न झालेल्या नववधुचे सोमवारी रात्री अपहरण झाल्याची तक्रार पतीने वडवणी पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना सदर नववधू अल्पवयीन असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी तिच्या माहेरच्या आणि सासरच्या एकूण 13 जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वडवणी तालुक्यातील खडकी येथील 25 वर्षीय तरुण 14 जून रोजी मुलगी पाहण्यासाठी बीड तालुक्यातील कामखेडा येथे गेला होता. त्याला मुलगी पसंद पडल्याने दोन्हीकडील नातेवाईकांच्या संमतीने त्याच दिवशी त्यांचा विवाह लावून देण्यात आला. रात्री नववधूला घेऊन सर्वजण खडकीला परतले. दुसर्‍या दिवशी देवदर्शनाचे विधी पार पडल्यानंतर रात्री 8 वाजता नववधू नैसर्गिक विधीचे कारण सांगून घराबाहेर पडली. बराच वेळ झाल्यानंतरही ती परत आली नाही. आजूबाजूला शोध घेऊनही ती न सापडल्याने तिच्या पतीने वडवणी ठाण्यात पत्नीचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदविली. अज्ञात व्यक्तीवर अपहरणाचा गुन्हा नोंद झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास पो.ना. राम बारगजे करीत होते.

बारगजे यांनी मुलीच्या नातेवाईकांचे जबाब घेतले असता त्यात संबंधीत नववधू 16 वर्षे 6 महिने वयाची अल्पवयीन असल्याची धक्कादायक माहिती मिळाली. बारगजे यांनी कामखेडा येथील जिल्हा परिषद शाळेतून त्या मुलीचा निर्गम उतारा काढल्यानंतर ती अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे बारगजे यांनी वडवणी ठाण्यात त्या अल्पवयीन मुलीच्या माहेरच्या आणि सासरच्या लोकांसह लग्नाला उपस्थित असलेल्या व्यक्तींविरुद्ध तक्रार दिली. सदर तक्रारीवरून मुलीचे आणि मुलाचे आई-वडील, पती आणि इतर नातेवाईक असे एकूण 13 जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान हा गुन्हा बीड ग्रामीण ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. अपहरणाचा तपास वडवणी पोलीस करीत आहेत.
दरम्यान, लग्नानंतर बेपत्ता झालेल्या त्या अल्पवयीन मुलीचा मंगळवारी रात्रीपर्यंत शोध लागलेला नव्हता. तिला कोणी आणि कोणत्या कारणास्तव पळवून नेले आहे, याचा कसून तपास सुरु असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Tagged