honey trap

हनी ट्रॅपमध्ये अडकला बीडचा डॉक्टर

न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र

मुंबई : मुळचा बीड जिल्ह्यातील असलेला परंतु सध्या मुंबईच्या केईएम रुग्णालयाच्या हॉस्टेलमध्ये वास्तव्यास असलेल्या एका डॉक्टरला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याची सव्वा दोन लाखाची फसवणूक करण्यात आली. मुंबईच्या भोईवाडा पोलीसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

बीड जिल्ह्यातील 28 वर्षीय डॉक्टरची इन्स्टाग्रामवर इला मनीषा अशी ओळख सांगणार्‍या तरुणीसोबत मैत्री झाली. दोघांनी मोबाइलवरून गप्पाही सुरू केल्या. याचदरम्यान मनीषाने डॉक्टरला संदेश पाठवून, तिने त्याच्यासाठी पाठवलेले पार्सल दिल्ली विमानतळावरील कस्टम कार्यालयात 36 हजार रुपये ऑनलाइन भरून घेण्यास सांगितले. मैत्रिणीसाठी डॉक्टरने पैसे भरण्याची तयारी दर्शवली. काही वेळातच डॉक्टरला एका अनोळखी व्यक्तीने फोन केला. कस्टम अधिकारी बोलत असल्याचे सांगत त्याने पैसे पाठविण्यासाठी बँकेच्या खात्याचा तपशील दिला. डॉक्टरने त्या खात्यावर 36 हजार रुपये भरले. त्यानंतर कस्टम क्लियरन्ससाठी आणखी 1 लाख 99 हजार भरावे लागतील, असे सांगण्यात आले. स्वतःच्या खात्यामध्ये इतके पैसे नसल्याने डॉक्टरने आपल्या दोन मैत्रिणीच्या खात्यामधून ही रक्कम ऑनलाइन पाठवली. तरीही पैसे भरण्यास सांगण्यात आल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर या डॉक्टरने भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, केईएम रुग्णालयातील डॉक्टरला हनी ट्रॅपमध्ये अडकवले. त्यानंतर गिफ्ट पाठवल्याची बतावणी करून त्याच्याकडील पैसे उकळले. अनोळखी व्यक्तीने डॉक्टरला पुन्हा फोन केला. आणखी 49, 500 रुपये जमा करण्यास सांगितले. डॉक्टरने ते जमा करण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फसवणूक झाल्याची तक्रार दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टरला ज्या ठिकाणाहून फोन करण्यात आला होता, त्याचे लोकेशन शोधले जात आहे. तसेच ज्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले, त्या बँक खात्याची माहिती घेण्यात येत आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

Tagged