vinayak mete, dhananjay munde,ashok thorat

काय चुकलं हे बघा, कोण चुकलं? हे नाही!

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड जिल्ह्यात एक कोरोनाचा रुग्ण व्हेंटिलेटर अभावी मयत झाल्याची तक्रार आ.विनायक मेटे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. या मयत रुग्णाचं खापर त्यांनी थेट जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्यावर फोडलं. ज्या व्हिडिओच्या आधारे त्यांनी तक्रार केली तो व्हिडिओ आरोग्य विभागाने केलेल्या दाव्यानुसार 29 जुलैचा आहे. त्याचवेळी त्या रुग्णाला ऑक्सिजनचा पुरवठा केला गेला. रुग्ण 30 जुलै रोजी मयत झाला. खरं-खोटं काय? यातील वस्तुस्थिती बाहेर यायलाच हवी. दोषींवर कारवाई देखील व्हावी. पण मयताच्या आडून कुणी जर आपलं इप्सित साध्य करू पहात असेल तर हे देखील मोठं दुर्दैवी आहे.

बीड जिल्हा रुग्णालयात काहीच सुविधा नाहीत, पालकमंत्री धनंजय मुंडे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात हे केवळ खरेदी करण्यात गुंतलेत असा आरोप आ.विनायक मेटे गेल्या काही दिवसांपासून करीत आहेत. आ.मेटे यांचं नेमकं ‘दुखणं’ काय हे ते थेट सांगत नाहीत. खरेदी केली आहे म्हणजे नेमकी कुठल्या वस्तुंची खरेदी केली याची यादी आ.मेटे यांनी माध्यमांना द्यायला हवी. माध्यमांना देऊन किंवा नुसतं ओरडून काही होणार नाही तर योग्य त्या अधिकार्‍यांकडे त्या संदर्भात तक्रार करून चौकशी समिती गठित करायला हवी. ‘दूध का दूध पाणी का पाणी’ व्हायलाच हवंय. पण या निमित्ताने एक विचारायला हवं की आ. मेटे 1997 पासून सलग विधान परिषद सदस्य आहेत. आतापर्यंत त्यांनी किती चौकशा लावल्या आणि त्याचं पुढे काय झालं हे देखील त्यांनी एकदा जाहीरपणे सांगावं. त्याशिवाय आरोग्य विभागाविरोधात छेडलेल्या आंदोलनाला लोकांमधून बळ मिळणार नाही.

या बातमीच्या जेपीजी इमेजसाठी इथे क्लिक करा

जिल्हा रुग्णालयात सोई-सुविधा नाहीत असं जे आ.मेटे सांगत आहेत त्यात नक्कीच तथ्य आहे. पण सोई सुविधा आताच नाहीत असे आहे का? तर नक्कीच नाही. हे वर्षानुवर्षे सुरुच आहे. आता कोरोना आला म्हणून आ.मेटे यांना आठवण आली. मग इतकी वर्षे आ.मेटे कुठे होते? आ.मेटेच नव्हे तर जिल्हाभरातील इतर लोकप्रतिनिधीही आतापर्यंत काय करत होते? (काही अपवाद आहेत) प्रसुती कक्षात महिलांना कधीच बेड उपलब्ध नसतात, अर्ध्याहून अधिक माता या जमिनीवर उपचार घेऊन आपलं घर गाठतात. डिझेल अभावी जननी सुरक्षा योजनेच्या गाड्या अनेकवेळा बंद असायच्या. कुठल्याच मोठ्या आजारावरील शस्त्रक्रीया या जिल्हा रुग्णालयात कधीच होत नव्हत्या. खासगी दवाखान्यावाले जिल्हा रुग्णालयातील रुग्ण पळवून न्यायचे. कधी ऑक्सिजन सिलींडर नाही तर कधी वीज नाही. कधी डॉक्टरांअभावी रुग्णाचे तडफडून मृत्यू झाले तर कधी औषध-गोळ्याच उपलब्ध नाहीत. असे एक ना अनेक प्रश्न वर्षानुवर्षापासूनचे आहेत. त्यात कितीतरी जणांचे बळी गेले. त्याविरोधात मोर्चे निघाले, गुन्हे नोंद झाले, पण आ.मेटे यांनी कधीच या गंभीर प्रश्नांकडे लक्ष दिलेले नाही. त्यांनी किमान आता तरी लक्ष दिले ही आनंदाचीच बाब आहे. पण काय चुकलं या पेक्षा कोण चुकलं? यावर त्यांचा फोकस असल्याने शंका निर्माण होत आहेत. सध्या कोण चुकलं? यावर काथ्याकूट करण्यात काहीच मतलब नाही. कारण कुणा एकाला जबाबदार धरण्याची सध्या परिस्थिती नाही. जे काम करतायत ते नाऊमेद होऊ नयेत एवढीच खबरदारी जबाबदार व्यक्तींनी घ्यायला हवी.

डॉ. अशोक थोरात यांच्या कार्यकाळात लोकसहभागातून आयसीयू कक्ष तयार केला. 200 ते 250 बेड लोकसहभागातून उपलब्ध केले. जिल्हा रुग्णालयात लागणार्‍या कितीतरी मशिनरी त्यांनी लोकसहभागातून उपलब्ध केल्या. याच आयसीयुअभावी आतापर्यंत कितीतरी रुग्ण तडफडून मेले. पण आता परिस्थिती बदलली. याचं श्रेय डॉ.थोरात यांना का नको? आज जिल्ह्यात एकूण 400 कोरोनाच्या रुग्णांना डिस्चार्ज मिळाला, त्यात जिल्हा रुग्णालयातील 147 जण आहेत. हे कुणामुळे झालं? त्याचंही श्रेय डॉ.थोरात यांना का नको? कोरोनामुळे आतापर्यंत 29 रुग्ण दगावले. त्यातील 16 जण जिल्हा रुग्णालय व त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या रुग्णालयात दगावले. या 16 पैकी 13 जणांना इतर आजार होते. त्यामुळे असे रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत नाहीत, ही जगभरातील वस्तुस्थिती आहे. अन्य तिघे जण गेले ते केवळ आपल्याला कोरोना झालाय या भितीपोटी गेले आहेत. लोकांमधील भिती कमी करण्याचं कामही लोकप्रतिनिधींनी करायला हवं.

कोरोनातून धडा घ्यावा
आ.विनायक मेटे यांच्या 23 वर्षाच्या आमदारकीच्या काळात अनेक जिल्हा शल्य चिकित्सक, पालकमंत्री आले गेले, पण कधीच त्यांनी जिल्हा रुग्णालयातील सोई-सुविधांविषयी ‘ब्र’ काढलेला नाही. आताच ते ओरडू लागले आहेत. येथील जिल्हा रुग्णालय सर्व सुविधांनीयुक्त करण्यासाठी आ.मेटे यांनी आतापर्यंत शासनाकडून फुटकी कवडी देखील आणलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. तरी देखील हेच मेटे जिल्हा रुग्णालयातील असुविधांविषयी ओरडत आहेत. आता असुविधांविषयी ओरडून काही होणार नाही तर येणार्‍या काळात काय सुविधा रुग्णालयात निर्माण कराव्या लागतील, याचा धडा कोरोनातून आ.मेटे व इतरही लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांनी शिकायला हवा.

Tagged