जलयुक्त शिवारमध्ये घोटाळा; 41 लाखांची होणार ‘वसुली’

अंबाजोगाई न्यूज ऑफ द डे परळी

बीड : तत्कालीन फडणवीस सरकारच्या जलयुक्त शिवार योजना या महत्वकांक्षी योजनेला ग्रामविकास मंत्र्यांच्याच बीड जिल्ह्यात भ्रष्टाचाराने चांगलेच पोखरलेले आहे. परळी व अंबाजोगाई तालुक्यातील घोटाळ्याप्रकरणी आता अधिकारी-कर्मचार्‍यांकडून 41 लक्ष रुपयांच्या वसूलीची कार्यवाही सुरु झाली आहे.

जिल्ह्यात जलयुक्त शिवार या महत्वकांक्षी योजनेला भ्रष्टाचाराने पोखरले आहे. यातील एक-एक कारनामा समोर येत आहे. याप्रकरणात पूर्वी तब्बल 138 संस्था, 26 अधिकारी-कर्मचार्‍यांवर परळी शहर पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी दक्षता पथकाकडून पाहणी, पंचनामा करुन सादर करण्यात आलेल्या अहवालाआधारे लोकआयुक्तांकडून आता घोटाळेबाज अधिकारी-कर्मचार्‍यांकडून वसूली करण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत 35 कोटींच्या घोटाळ्याच्या तक्रारी असून 4 कोटींचा घोटाळा झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. यातील दुसर्‍या तक्रारीच्या अनुषंगाने 41 लक्ष रुपयांची वसूली करण्यात येणार आहे. याची प्रक्रिया विभागांतर्गत सुरु करण्यात आली आहे. यातील 50 टक्के रक्कम ही संबंधित कंत्राटादारांकडून वसूल करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

आणखी 8 जणांवर गुन्हे दाखल होणार
सुरुवातीस राजकीय दबावापोटी ही चौकशीस टाळाटाळ होत होती. आता लोकायुक्तांच्या आदेशावरुन ही कार्यवाही होत असून पूर्वीच्या दाखल गुन्ह्यात अधिकार्‍यांवर पुन्हा गुन्हे दाखल होणार आहेत. यात 8 जणांचा नव्याने समावेश असणार आहे. यात तत्कालीन कृषी अधीक्षक रमेश भताने यांच्यावर देखील गुन्हा दाखल होणार असल्याचे तक्रारदार आणि काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी सांगितले आहे.

Tagged