msrtc

आंतरजिल्हा बससेवा लवकरच होणार सुरु- विजय वडेट्टीवार

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

मुंबई: कोरोनामुळे जग ठप्प झालं आहे. देशात तर महाराष्ट्र असं राज्य आहे, जिथे रुग्णसंख्या तुलनेने अधिक आहे. पुन्हा सगळं सुरु करून गाडी पूर्ववत करणं अवघड असलं तरी गरजेचं आहे. कोरोनामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत आहे. कोरोना प्रसाराची साखळी तोडण्यासाठी आणि रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउनचं पाऊल टाकलं होतं. त्यामुळे सर्वच वाहतूक सेवा बंद करण्यात आल्या.

हळूहळू लॉकडाउन शिथिल केला जात असून, राज्यातही लवकरच आंतरजिल्हा बससेवा सुरू होणार आहे. राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याविषयी महत्त्वाची माहिती दिली.

राज्यात कोरोनाचा प्रसार झपाट्यानं होत असल्यानं राज्य सरकारनं प्रवासी वाहतूक बंद करण्याबरोबरच आंतरजिल्हा वाहतूकही थांबवली होती. मार्चच्या अखेरीपासून राज्यातील बससेवा बंद करण्यात आली. त्यानंतर मिशन बिगिन अगेनला सुरूवात झाल्यानंतर जिल्ह्यात बससेवा सुरू करण्यात आली. त्यातही सोशल डिस्टन्सिगचं बंधन घालण्यात आलं होतं.

आता लवकरच सरकारकडून आंतरजिल्हा बससेवाही सुरू करण्यात येणार आहे. राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार याविषयी बोलताना म्हणाले,” एसटीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील. आपत्ती व्यवस्थापन विभागाचा मंत्री म्हणून मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आंतरजिल्हा बससेवा सुरू करण्याबद्दलही चर्चा झाली, त्याला सकारात्मक भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत याबाबत निर्णय होणे अपेक्षित आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.

कोचिंग क्लासलाही लवकरच दिली जाणार परवानगी

राज्यातील कोचिंग क्लासेलाही लवकरच परवानगी दिली जाणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली. “कोचिंग क्लासेससंदर्भात चर्चा झाली आहे. जशी जिमसाठी नियमावली तयार करण्यात आली. त्याचप्रमाणे कोचिंग क्लासेसलाही काही नियमावली लावून परवानगी देण्यात येईल,” असं वडेट्टीवार म्हणाले.

Tagged