पुरुषोत्तमाचे मंदिर केलं बंद!

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड माजलगाव

माजी आमदार देशमुख, तहसिलदार डॉ.गोरे यांच्या हस्ते केली पुजा

माजलगाव ः देशातील एकमेव असलेले भगवान पुरूषोत्तमाचे मंदिर तालुक्यातील पुरूषोत्तमपुरी येथे आहे. अधिकमासाच्या महिण्यात भगवान पुरूषोत्तमांच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविकांची गर्दी असते. परंतू यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेवून देवस्थान समितीकडून अधिकमासाच्या पहिल्या दिवशी शुक्रवार दि.18 रोजी सकाळी 9 वा. माजी आमदार आर.टी.देशमुख, तहसिलदार डॉ.प्रतिभा गोरे यांच्या हस्ते महापुजा करण्यात येवून मंदिर बंद केले आहे. 
      दर तीन वर्षांनी अधिक मास येतो. हा महिना जावयांसाठी एक पर्वणीच असते. या काळात अनेक भाविक महिनाभर उपवास करतात. तसेच पुरूषोत्तम महात्म्याचे पारायण केले जाते. देशभरातील एकमेव भगवान पुरूषोत्तमाचे मंदिर माजलगाव तालुक्यातील पुरूषोत्तमपुरी येथे आहे. दर तीन वर्षानी या ठिकाणी अधिकमासांत महिनाभर यात्रा भरते. परंतू यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने देवस्थान समितीसह ग्रामपंचायतने यात्रा रद्द केली आहे. परंतू अधिकमासांच्या प्रारंभी पहिल्या दिवशी माजी आमदार आर.टी.देशमुख, तहसिलदार डॉ.प्रतिभा गोरे, माजी सभापती नितीन नाईकनवरे, पं.स.चे माजी सभापती जयदत्त नरवडे यांच्या हस्ते महापुजा करण्यात आली. यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेवून मंदिर दर्शनासाठी खुले न ठेवण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. त्यानूसार महापुजेनंतर मंदिर बंद करण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये असे अवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Tagged