SRT HOSPITAL AMBAJOGAI

‘स्वाराती’त कोरोनाचा पहिला रूग्ण; आता प्रशासनावरील ताण वाढणार

अंबाजोगाई बीड

अंबाजोगाई : येथील स्वाराती रूग्णालयात कोरोनाचा आज (दि.5) पहिला रूग्ण आढळला आहे. धारूर तालुक्यातील आंबेवडगावच्या 65 वर्षीय मुंबई रिटर्न व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने स्वाराती प्रशासनातही आता खळबळ उडाली असून स्वाराती प्रशासनावरील ताण वाढणार आहे.

अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. त्याठिकावरुन आतापर्यंत अनेकांचे स्वॅब पाठविण्यात आले. आज पहिल्यांदाच या रुग्णालयात कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. स्वाराती प्रशासन कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे. नव्याने कोव्हिड रुग्णालय सुरु असून 250 खाटांची व्यवस्था केलेली आहे.
आणखी आठ दिवसांनी प्रयोगशाळा सुरु होणार
कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळा सुरु होणार आहे. कोरोना रुग्णाचा जिल्ह्यातील आकडा शून्य असताना प्रयोगशाळा सुरु करण्याची प्रक्रिया सुरु झाली, तो आकडा पन्नाशी पार गेला तरी अद्याप प्रयोगशाळा सुरु नाही. प्रयोगशाळा सुरु होण्यास आणखी आठ दिवस लागतील असे स्वाराती प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
तोकड्या मनुष्यबळावर आता मदार
येथील रुग्णालयातून मुंबईला 42 डॉक्टरांसह कर्मचार्‍यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. सुरवातीस 56 जणांची प्रतिनियुक्ती होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्याला लोकप्रतिनिधींनी विरोध केला. त्यावेळी 28 जणांची प्रतिनियुक्ती करण्याचे आश्वासन देण्यात आले. रातोरात्र राज्य शासनाने 48 डॉक्टारांसह कर्मचार्‍यांची प्रतिनियुक्ती केली. त्यामुळे आता कोरोना रुग्ण वाढल्यानंतर डॉक्टरांची निश्चित कमतरता भासणार आहे. त्यामुळे स्वाराती प्रशासनाला तोकड्या मनुष्यबळावर मात करुन रुग्ण सेवा द्यावी लागणार हे मात्र नक्की.