जप्त केलेल्या 12 दुचाकी तहसिल कार्यालयातून लंपास

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा

चंद्रकांत अंबिलवादे : दि.20 , गोदावरील नदीपात्रातून अवैध वाळू उपसा व उत्खनन केल्याप्रकरणी अनेक दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या. शुक्रवारी (दि.20) चक्क पैठण येथील तहसिल कार्यालयातून दिवसाढवळ्या 12 दुचाकी लंपास करण्यात आल्या आहेत. दुचाकी पळवण्याची वाळू माफियांनी हिम्मत केलीच कशी? असा प्रश्न उपस्थिती होत असून या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

याबाबत माहिती अशी की, पैठण शहर व परिसरात वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आहे. वाळू माफियांनी चक्क तहसील कार्यलयाच्या बंदिस्त इमारतीच्या आवारात असलेल्या जवळपास 12 दुचाकी दुपारी 4 वाजेच्या सुमारास लंपास केल्या आहेत. विशेष म्हणजे यावेळी तहसीलदार चंद्रकांत शेळके हे नेहमीप्रमाणे कार्यालयीन कामकाज करीत असताना हा प्रकार घडलेले आहे. या घटनेेने पैठण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत चंद्रकांत शेळके यांच्या वतीने मंडळ अधिकारी वसुदा बागुल, तलाठी डी.एम गाढे चोरीस गेलेल्या वाहनाचा पंचनामा करून पोलिसात तक्रार देण्याचे काम सुरू होते. या घटनेने वाळू माफियांची पैठणमध्ये असलेली दहशत दिसून येत आहे. या प्रकरणामध्ये काही महसुल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचा तर सहभाग नाही ना? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

तहसीलदार शेळकेंची गोलमोल भूमिका
तालुक्यातील महत्त्वाचे शासकीय कार्यालय म्हणून ओळख असलेल्या पैठण तहसिल कार्यालयातून दिवसाढवळ्या जप्त केलेल्या दुचाकी लंपास करण्यात आल्या. या प्रकरणामध्ये तहसिलदार चंद्रकांत शेळके यांनी गोलमोल धोरण अवलंबले आहे. त्यामुळे या प्रकरणात योग्य कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे.

Tagged