लॉकडाऊनबाबत आठ दिवसात निर्णय

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

आवश्यक तिथे निर्बंध घालणार : मुख्यमंत्री
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी लॉकडाऊनबाबत काय निर्णय होणार? याकडे राज्याचे लक्ष लागले होते. याबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. यावेळी ‘मी जबाबदार’ अशी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. यात दिलासादायक बाब म्हणजे आता लस उपलब्ध आहे. लसीकरणाबाबत गैरसमज दूर करून राज्यात 9 लाख कोविड योद्धांना लसीकरण केले. यापैकी कोणालाही साईड इफेक्ट दिसून आलेला नाहीत. लस उत्पादन आणखी वाढवणार आहोत. आणखी 1 -2 कंपन्या लस उत्पादित करणारत आहेत. बाजारात लस उपलब्ध होईपर्यंत काळजी घ्यावी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात युद्धाप्रसंगी वार करण्यासाठी तलवार तर वार झेलण्यासाठी ढाल वापरण्यात येत होती. आता मास्क हीच ढाल अन् तलवार आहे, असं समजून वापर करावा. राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढतोय. आता नवी लाट येत आहे की नाही, हे येत्या 15 दिवसात स्पष्ट होईल. तत्पूर्वी, आपल्याला खबरदारी घ्यावी लागणार आहे. लॉकडाऊन हा कोरोनावर ईलाज असे की नाही माहिती नाही, पण संपर्क तोडणे हा उपाय आहे हे स्पष्ट झालेलं आहे. शासकीय कार्यक्रम पुन्हा एकदा ऑनलाईन घेण्याच्या सूचना दिल्या. आता सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्वाची सूचना केली. सर्वांनाच पक्ष वाढवायचा आहे, पक्ष वाढवताना कोरोना वाढायला नको. आगामी काळात गर्दीच्या आंदोलनावर, हॉटेल, हॉलसह नियम मोडणार्‍या सर्वच बाबींवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच, शासकीय कार्यालयांच्या वेळा विभागणी करून करण्यात येतील, यात वर्क फ्रॉमचाही वापर व्हावा असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, लॉकडाऊन करायचा का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी जनतेला केला. यावेळी ते म्हणाले येत्या आठ दिवसात मी परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार आहे. ‘मी जबाबदार’ मोहिमेंतर्गत मास्क वापरा, शिस्त पाळा असे आवाहन त्यांनी केले.
तुम्ही कोरोनावाहक ठरू नका
ठिकठिकाणी कोविड योद्ध्यांचा सन्मान सोहळा पार पडत आहे. त्यांचा सन्मान झालाच पाहिजे. परंतू सोबतच या योद्ध्यांची संख्या वाढली पाहिजे. तुम्ही कोरोना योद्ध्या होत नसाल तरी त्यांचा सत्कार करताना कोरोनावाहक ठरू नका. त्याअनुषंगाने अधिकाधिक खबरदारी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

Tagged