corona lasikaran

लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही दोघे पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे मराठवाडा

औरंगाबादेतील प्रकार

औरंगाबाद, दि. 3 : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण सुरू करण्यात आली आहे. लसीकरणाला चांगला प्रतिसादही मिळत आहे. मात्र कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही दोघेजण पॉझिटिव्ह आढळून आल्याचे समोर आले आहे. या दोघांच्याही लाळेचे नमुने तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवले जाणार आहेत.

औरंगाबादेत कोरोनाचा फैलाव झपाटयाने वाढत चालला आहे. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना लस देण्यास सुरूवात झाली. दुसर्‍या टप्प्यात फ्रन्टलाईन वर्कर्सचे लसीकरण हाती घेण्यात आले. आता 1 मार्चपासून तिसर्‍या टप्प्यात जेष्ठ नागरिक आणि इतर आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. लसीकरणाला नागरिकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो. त्यानंतरही कोरोना झाला तर त्याचा फारसा त्रास जाणवत नसल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.

शहरात कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही दोघेजण पॉझिटिव्ह निघाल्याचे समोर आले आहे. या दोघांचे डोस पूर्ण होऊन चार ते पाच दिवस झाले असून त्यांना त्रास जाणवत असल्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या प्रकारामुळे आरोग्य विभागानेही चिंता व्यक्त केली आहे.

याबाबत बोलताना मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.नीता पाडळकर म्हणाल्या, शहरात कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही दोघेजण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या दोघांचेही लाळेचे नमुने तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवले जाणार आहेत. मात्र शंका आल्यामुळे दोघांची आरटीपीसीआर टेस्ट केली. त्यामध्ये त्यांच्यात सौम्य लक्षणे आढळून आली. आहेत. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर साधारणपणे 15 दिवसांनी अ‍ॅटीबॉडीज् तयार होते. लस घेतल्यावरही मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे हे नियम पाळावेच लागतील.

Tagged